बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण

माथेरान पालिकेची डोळ्यावर पट्टी

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान नगरपरिषदमधील विरोधी पक्षाच्या तक्रारीनंतर पालिकेच्या कनिष्ठ अभियंता यांनी बोहरी समाज हॉल येथे सुरू असलेल्या अतिरिक्त बांधकामाची पाहणी दहा दिवसाआधी केली. मात्र, पालिकेकडून त्या अतिरिक्त आणि वाढीव असलेल्या अतिक्रमण बांधकामावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आता त्याच बोहरी समाज हॉलच्या गेटसमोर अतिक्रमण केले जात आहे.

दरम्यान, माथेरान नगरपरिषद प्रशासन कोणत्या भीतीमुळे त्या वाढीव बांधकामावर कारवाई करीत नाही असा सवाल माथेरानमधील सर्वसामान्य जनता उपस्थित करीत आहे. त्याचवेळी दिवसाढवळ्या माथेरान नगरपालिका गटारावर अनधिकृत बांधकाम होत असताना सत्ताधारी गटाकडून बघ्याची भूमिका घेण्यात येत असल्याने पालिकेचे विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

माथेरान रेल्वे स्टेशन समोरील सैफउद्दिन मेमोरियल हॉलमध्ये अनधिकृत बांधकाम आणि मातीचे खोद काम चालू आहे. त्याबाबत मुख्याधिकारी आणि इतर अधिकारी यांना याबाबत तक्रार केल्या. पालिकेचे बांधकाम विभाग शाखा अभियंता यांनी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांसह सदर कामाची पाहणी केली. त्यानंतर आपण ही सर्व माहिती पालिका मुख्याधिकारी यांना अहवाल स्वरूपात कळवू, असे आश्वासन शाखा अभियंता यांनी दिले होते. मात्र, मागील आठ दिवसात हॉलच्या वरच्या मजल्यावर सुरू असलेल्या अतिरिक्त बांधकामावर कारवाई होण्याऐवजी त्या ठिकाणी नगरपरिषदेच्या रस्त्यावर अतिक्रमण केले जात आहे. त्या ठिकाणी शासनाचा अधिकारी वर्ग मुख्याधिकारी, अभियंता आणि इतर लोकांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आणि वृक्षतोड, मातीचे खोदकाम चालू आहे.

बोहरी धर्मगुरू यांनी माथेरानच्या निसर्गावर प्रेम करीत निसर्ग सौंदर्य टिकवून ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांना पर्यटनासाठी आणा, असे आवाहन केले आहे. त्यांच्या न कळत माथेरान शहरात कच कासल बंगला, एलफिन्स्टन बंगला, सेठ वीला, मेमोरियल हॉल इत्यादी ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांवर कोण बोलणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

माथेरानमधील विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी वज्रमूठ उगारली असून सर्व लोकप्रतिनिधींनी शहराचे विद्रुपीकरण थांबवावे यासाठी हातात हात घालून काम करावे, असे आवाहन विरोधी पक्षाचे नेते सीताराम कुंभार यांनी केले आहे. दरम्यान, या कामाबाबत माथेरान नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखे वागणे सुरू आहे. त्यामुळे आता थेट रस्त्यावर अतिक्रमण केले जात असून त्याला विरोधी पक्षाने विरोध केला आहे. परंतु पालिका अधिकारी या सर्वांकडे दुर्लक्ष करीत असल्याने पालिकेचे विरोधी पक्षाचे सर्व नगरसेवक रायगड जिल्हाधिकारी यांना भेटून या सर्व गोष्टी मांडणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Exit mobile version