एका मालमत्तेला वेगळा न्याय, अन्य मालमतांना वेगळा न्याय
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहर हे वनजमिनीवर वसले आहे. त्यामुळे वन विभागाचा अधिकार असलेल्या येथील जमिनीवर माथेरान नगरपरिषदेच्या मालमत्तादेखील आहेत. त्या मालमत्ता या विकण्यास बंदी आहे आणि त्यामुळे शहरात रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या एका मालमत्तेबाबत चक्क माथेरान नगरपरिषदेने ही मालमता विकत घेऊ नये, असे आवाहन करण्यात येणारे फलक लावले आहेत. दरम्यान, माथेरान शहरात कपाडिया मार्केटमधील मालमत्तांचे विक्री व्यवहार झाले असून, त्याबाबत दोन-तीन वर्षांत पालिकेने असे कोणतेही फलक लावले नसल्याने माथेरान नगरपरिषदेच्या या तत्परतेबद्दल उलटसुलट चर्चा सुरु आहे.
माथेरान शहरामधील कपाडिया मार्केट हे दान देण्यात आलेली मालमता आहे. दान करण्यात आलेल्या मालमत्तेमधील कोणताही गाळा हा कायमस्वरूपी भाडेतत्त्वावर देण्याचे धोरण होते. मात्र, कपाडिया मार्केटमधील काही मालमत्तांची विक्री झाली असल्याची चर्चा माथेरानमध्ये आहे. त्यावेळी माथेरान पालिकेकडून किंवा आतापर्यंत कपाडिया मार्केटमधील गाळ्यांची विक्री होणार नाही की विक्री करू नये किंवा कोणालाही विक्री करू नये अशा प्रकारचे कोणतेही फलक माथेरान पालिकेने अद्याप लावले नाहीत. मात्र, याच माथेरान पालिकेने शहरातील स्टेशनसमोर असलेल्या जागेबाबत सदर जागा माथेरान पालिकेची असून, त्या जागेची खरेदी कोणी करू नये, असे फलक लावले आहेत. त्यामुळे माथेरान शहरातील भूखंड क्रमांक 165 हि जमीन पालिकेची असल्याने कोणी खरेदी करू नये, असे फलक लावल्याने शहरात एकच चर्चा सुरु झाली आहे.
शहरातील कपाडिया मार्केटमधील तसेच माथेरान स्टेशन समोरील बोहरी धर्मशाळा अशा जागांबाबत माथेरान पालिका क्रियाशील नसल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. पण शहरातील भूखंड क्रमांक 165 बद्दल दाखवलेली तत्परता याबद्दल शहरात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.माथेरान पालिका वेगवगेळ्या भूखंडांबाबत वेगेवेगळी भूमिका घेताना दिसत असल्याने पालिकेच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.माथेरान पालिकेने लावलेला फलक हा ज्या 165 भूखंड याला लावला आहे,त्या भूखंडापासून अवघ्या 20 मीटर अंतर पुढे असलेली बोहरी धर्मशाळा हि मालमत्ता कोणाची होती याचा शोध पालिका मुख्याधिकारी घेणार आहेत काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.