नागोठण्यात बांधकाम खात्याच्या जागेत अतिक्रमण

| नागोठणे | वार्ताहर |
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित असलेल्या व नागोठण्यातील महामार्गालगतच असलेल्या पिराचा माळ नामक उल्लेख असलेल्या परिसरात तसेच नागोठणे – पेण जुन्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या सरकारी जागेवर अनधिकृत भराव करून कालांतराने शेड व कुंपण करुन ती जागा हडप करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

यासंदर्भात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नागोठणे येथील गट नं. 127 चा 2 ब मधील मोठ्या व खूप खोल असलेल्या या जागेवर नागोठण्यातील एक-दोन व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव केल्याचे येथील मोहल्ला भागातील नागरिकांनी रोहाच्या तहसीलदार कविता जाधव यांच्या निदर्शनास एप्रिल, 2021 मध्ये आणून दिले होते. त्यानुसार नागोठणे तलाठी गणेश विटेकर यांनी सदर जागेवर स्वतः जावून मोहल्ल्यातील अशपाक सुमरा, काझीम पानसरे व अन्य पंचा समक्ष पंचनामा करून सदर पंचनामा पुढील कार्यवाहीसाठी रोहा तहसील कार्यालयाकडे पाठवून दिला होता.

दरम्यान यासंदर्भात बेकायदेशीर भराव करणार्‍या संबधितांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे रोहा तहसील कार्यालयातील अव्वल कारकून बालाजी देशमुख यांनी 30 एप्रिल, 2021 रोजी सांगितले होते. तर सदर नोटीस लवकरच तहसील कार्यालयातून आणून त्यानंतर ती संबधित व्यक्तीला बजावण्यात येईल असे नागोठणे तलाठी गणेश विटेकर यांनी त्यावेळी सांगितले होते. मात्र याप्रकरणी संबधितांवर कोणती कारवाई झाली हे आजपर्यंत गुलदस्त्यातच राहिले होते. म्हणून तर अतिक्रमण धारकांनी पुन्हा डोके वर काढल्याचे सद्य स्थितीत दिसून येत आहे. गट नं. 127 चा 2 ब या जागेबरोबरच याच नागोठणे – पेण रस्त्याच्या दोन्ही बाजूला अन्य काही 4-5 जणांनी आपल्या जागेत बांधकाम करतांनाच सार्वजनिक बांधकाम खात्याची काही जागाही हडप केल्याचे मोहल्ल्यातीलच नागरिक सांगत आहेत.

त्यामुळे आता रोहा तहसील कार्यालयाकडून तसेच जागा मालक असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून याप्रकरणी संबधितांवर काय कारवाई होते याकडे नागोठण्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. तर या अतिक्रमण संदर्भात जागामालक सार्वजनिक बांधकाम खात्याने पुढे येण्याची गरज असल्याचे नागोठणे तलाठी गणेश विटेकर यांनी सांगितले. त्यामुळे आता याप्रकरणी काही जागरुक नागरिकच सार्वजनिक बांधकाम खाते व रोहा तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार करणार करुन लक्ष वेधणार असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे एम.एन.घाडगे व रोहा तहसीलदार कविता जाधव यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Exit mobile version