तक्रारीनंतरही अधिकार्यांचे जाणूनबुजून दुर्लक्ष; भाजप शहराध्यक्ष सचिन मोदी यांचा आरोप
| नागोठणे | वार्ताहर |
जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागोठण्यात जमिनीला आता सोन्याचा भाव मिळत असून, एक-एक फूट जागेलाही खूप मोल आले आहे. असे असतानाच पेण फाटा ते नागोठणे एसटी स्टँड व पुढे प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत असलेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यालगतच्या जागेवरही अतिक्रमण करणार्यांची वक्रदृष्टी पडत आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत हा मार्ग अरुंद असल्यामुळे या रस्त्यावरून जाताना लोकांना नेहमीच ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. हा रस्ता अरुंद असल्यामुळे मागील वर्षी या रस्त्यावरून जाताना एका तरुणाचे अपघाती निधन झाले होते. याच रस्त्यालगत येथील रहिवासी शोभा रवींद्र ताले यांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करुनसुद्धा संबंधित अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असून, कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप भाजप नागोठणे शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
श्रीमती शोभा ताले यांनी त्यांच्या घरासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेमध्ये कंपाऊंड बांधून ती जागा आपल्या ताबे कब्जात घेतली आहे. त्यांनी त्या जागी महागड्या लाद्या आणि इतर महागड्या वस्तू लावून सुशोभिकरण केले आहे. सरकारी रस्त्यावरच अतिक्रमण करून त्यांनी लोकांची रहदारी असलेला रस्त्यात अडथळा निर्माण करून तो रस्ता बंद केला आहे. याबाबत आपण सार्वजनिक बांधकाम खाते रोहा, तहसिलदार रोहा व जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे लेखी तक्रारही केली असल्याचे सचिन मोदी यांनी सांगितले.
अतिक्रमणधारकाला यापूर्वीच पहिली नोटीस बजावण्यात आली असून, अतिक्रमण अद्याप काढण्यात न आल्याने सोमवार, दि. 23 जानेवारीला दुसरी नोटीसही काढण्यात आली आहे. यानंतरही ते अतिक्रमण दूर न केल्यास महसूल खात्याच्या सहकार्याने पुढील कारवाई करण्यात येईल.
अरुण देवकते, उपाभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभाग-रोहा
शासनाचे आदेश येताच स्वखर्चाने कुंपण काढून देणार , आम्ही त्या जागेवर अतिक्रमण केले नसून, केवळ सुशोभिकरण केले आहे. शासनाला रस्ता रुंदीकरण व अन्य कामाकरिता जागेची गरज लागल्यास मी स्वखर्चाने घातलेले कुंपण काढून टाकण्याचे लिहून दिले आहे.
मिलिंद ताले