सिडकोच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
| उरण | प्रतिनिधी |
जांभूळपाडा व बेलोंडा खार परिसरात सिडकोच्या लॉजिस्टिक पार्कसाठी आरक्षित जमिनीवर उभारलेल्या बेकायदेशीर कंटेनर यार्डवर मोठी कारवाई करत बुलडोझर चालवण्यात आला. तब्बल 1,20,437 चौ. मीटर क्षेत्रावरील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. परंतु, या कारवाईनंतर आता सिडकोच्या भूमिकेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. उरण-पनवेल तालुक्यातील अनेक वर्षांपासून फोफावलेल्या बेकायदेशीर साम्राज्यांकडे अद्यापही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा संतापजनक आरोप जनतेतून होत आहे.
सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने जांभूळपाडा (सर्वे क्रमांक 50,51,52) आणि बेलोंडा खार (सर्वे क्रमांक 46 ते 60) येथील कंटेनर यार्डवर पोकलेनच्या सहाय्याने कारवाई केली. त्यामध्ये यार्ड कार्यालये, पत्र्याची कुंपणे आणि इतर बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार आणि मुख्य नियंत्रक विशाल ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस, महावितरण, सिडको सुरक्षा पथक इत्यादी यंत्रणांचा मोठा फौजफाटा सहभागी होता. परंतु, या कारवाईनंतर ‘हीच कडक भूमिका सर्वत्र का दिसत नाही?’ असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. कारण उरण-पनवेल परिसरात सिडकोच्या जागांवर वर्षानुवर्षे बेकायदेशीर कंटेनर यार्ड, ढाबे, पार्किंग आणि इतर बांधकामे अक्षरशः बोकाळली आहेत.
काही ठिकाणी तर सरकारी जमिनीवर खुलेआम व्यवसाय सुरू असूनही प्रशासन मात्र शांत बसल्याचे दिसते. त्यामुळेच ‘सिडकोची कारवाई निवडकांवरच का?’ असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. ‘छोट्यांवर बुलडोझर आणि मोठ्यांना मोकळीक’ हीच कार्यपद्धती सुरू आहे, अशी टीका जोर धरू लागली आहे. याहून गंभीर म्हणजे, या सर्व प्रकारामागे आर्थिक लागेबांधे असल्याचा आरोपही पुढे येत आहे. ‘मलिदा’ मिळणाऱ्यांना अभय आणि इतरांवर कारवाई, अशीच परिस्थिती असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक वर्षे उभे असलेले बेकायदेशीर यार्ड, ढाबे आणि पार्किंग व्यवसाय कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? असा जळजळीत सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. दरम्यान, जांभूळपाड्यावर कारवाई करून सिडकोने कडक भूमिका घेतल्याचा दावा केला असला, तरी उरण-पनवेलमधील सर्व अतिक्रमणांवरही तातडीने एकसमान कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा ही कारवाई केवळ दाखवण्यासाठी असून, पडद्यामागे आर्थिक व्यवहारांचा खेळ सुरू असल्याचा आरोप अधिकच बळावणार आहे. त्यामुळे आता सिडको खरोखरच निष्पक्षपणे सर्व बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करते की पुन्हा एकदा बड्या अतिक्रमणधारकांना पाठीशी घालते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.







