चिरनेरकरांना मोठा दिलासा
| चिरनेर | वार्ताहर |
दरवर्षी चिरनेर गावाला सर्वाधिक पुराचा फटका बसत आहे. यावर्षी 19 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे गावात हाहाकार उडाला होता. दरम्यान, संभाव्य पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजनांची प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, यासाठी उरण तालुका पत्रकार संघातर्फे उरण तहसिल, उरण गटविकास अधिकारी, तसेच पनवेल भिंगारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदन देण्यात आले होते. दरम्यान, याबाबत तात्काळ कार्यवाही करुन अतिक्रमणे हटविण्यात येतील, असे आश्वासन संबंधित प्रशासनाकडून देण्यात आल्याने पावसाळी पाण्याचा मार्ग मोकळा होणार असून, चिरनेरकरांची पूरसदृश्य परिस्थितीतून सुटक होणार आहे. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.
गावातील पूरसदृश्य परिस्थितीला कारणीभूत ठरणारी नाल्यावरील अतिक्रमणे तात्काळ हटवून महामार्गावरील पाण्याचा निचरा होणाऱ्या अरुंद मोऱ्यांचे रुंदीकरण करण्याबाबतच्या लक्षवेधी सूचना मांडण्यात आल्या होत्या. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने गव्हाण फाटा, चिरनेर रस्त्यावर चार पाईप मोऱ्या व एक स्लॅब ड्रेन यांची पुनर्बांधणी करण्याची प्रस्तावित कामे मंजूर करून घेण्यात आली आहेत. तसेच कामांच्या प्रारुप निविदा मंजुरीसाठी अधीक्षक अभियंता, रायगड सा.बां. मंडळ, कोकण भवन, नवी मुंबई यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या आहेत. लवकरच या कामांची निविदा सूचना प्रसिद्ध होऊन पुढील कार्यवाही होईल, अशा आशयाचे पत्र उरण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष जीवन केणी यांना प्राप्त झाले.
ग्रामपंचायतीमार्फत देण्यात आलेल्या बांधकाम परवानगीनुसार व सा.बां. विभागाची कोणतीही परवानगी न घेता रस्त्यालगत करण्यात आलेली अतिक्रमणे हटविण्यासाठी महसूल विभाग, पोलीस विभाग, सा.बां. विभाग व ग्रामपंचायत चिरनेर यांची संयुक्त मोहीम राबविणे आवश्यक असल्याचेही पत्रात म्हटले आहे. याबाबतची कार्यवाहीदेखील लवकरात लवकर करण्यात येईल, असे सा.बां. उपविभागीय अधिकारी उरण यांनी कळविले आहे. गव्हाण फाटा ते चिरनेर मार्गावरील चिरनेर ते मोठेभोमदरम्यान महामार्गावरील नैसर्गिक पाणी जाण्याच्या मार्गावर ज्या ज्या ठिकाणी मोऱ्या आहेत, त्यापैकी काही मोऱ्या भरावांनी बुजल्या गेल्या आहेत. तर, काही मोऱ्या मूळच्याच लहान आकाराच्या असल्यामुळे त्यातून पाण्याचा योग्य रीतीने निचरा होत नाही. नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमणे आणि भरावामुळे खाडीपर्यंत पाणी पोहोचण्यास मोठा अडथळा निर्माण होत असल्यामुळे गावात पाणी तुंबून हे पुराचे पाणी येथील रहिवाशांच्या घरात शिरत आहे. त्यामुळे दरवर्षी येथील नागरिकांना पुराच्या पाण्याचा सामना करावा लागत असून, येथील त्यांना जीव मुठीत घेऊन जगण्याची वेळ आली आहे.
दरवर्षी सतावणाऱ्या पुराच्या पाण्याचा गंभीर प्रश्न मार्गी लागावा, यासाठी उरण तालुका पत्रकार संघातर्फे निवेदनाच्या माध्यमातून पत्रकारांनी आक्रमक पवित्रा घेऊन पूरपरिस्थितीच्या निवेदनाच्या प्रती संबंधित प्रशासनाला 27 जुलै रोजी दिल्या होत्या. यानंतरही पत्रकार संघाने संबंधित प्रशासन यंत्रणेशी वारंवार संपर्क साधून, त्यांना लक्षवेधी सूचना केल्या. या अनुषंगाने चिरनेर गावाच्या पूरपरिस्थितीचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास वाटतो. दरम्यान, 19 जुलै रोजी चिरनेर गावात झालेल्या पुरातील पूरग्रस्त अद्याप मदतीच्या प्रतिक्षेत असून, यात सावळागोंधळ असल्याचे नागरिकांकडून बोलले जाते.
