। चंद्रपुर । प्रतिनिधी ।
मकर संक्रांतीत मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जात असतात. दरम्यान, पतंग उडविण्यासाठी लागणार्या नायलॉन मांजाचा वापर न करण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. मात्र, तरीही प्रशासनाचे आदेश धुडकावून नायलॉन मांजाचा वापर करणार्या 34 जणांना स्थानिक गुन्हे शाखेने तडीपार केले आहे. नायलॉन मांजा विक्रेत्यावर थेट तडीपार करण्याची ही राज्यातील पहिलीच कार्यवाही ठरली आहे.
मकर संक्रातीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पतंग उडविल्या जात असतात. प्लास्टीक व इतर कृत्रिम वस्तूपासून बनविलेल्या नायलॉन मांज्याचा वापर पतंग उडविण्यासाठी केला जातो. या मांजामुळे पक्ष्यांना तसेच मानवाला इजा होण्याची शक्यता असते. अश्या अनेक घटना घडल्या आहेत. या धाग्यावर शासनाने बंदी घातलेली असली तरी छुप्या मार्गाने याची विक्री केली जात आहे. चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागाने पर्यायी पर्यावरण पुरक धाग्याच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यात अधिसुचना जारी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
दरम्यान, नायलॉन मांजावर प्रतिबंध घालण्यासाठी विशेष पथक पोलीस विभागाने तयार केले असून या पथकामार्फत धाडसत्र सुरु आहे. नायलान मांजा विक्री करणार्या 34 जणांवर तडीपारची कार्यवाही पोलीस विभागाने केली आहे. त्यात चंद्रपूर 19, रामनगर 08, घुग्घुस 02, दुर्गापुर 4 व मुल येथील 1 जण, अशा एकूण 34 जणांना दि.13 ते 15 जानेवारीपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले आहे.