। मुंबई । प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (दि.14) मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गृहमंत्रीपदाची गरिमा राखली पाहिजे, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. यावेळी, शरद पवार यांनी गुजरातमधील पूर्वीच्या नेत्यांची उदाहरणे दिली आहेत. दरम्यान, शिर्डीत रविवारी (दि.12) भाजपचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते. यावेळी अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला शरद पवार यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.
स्वातंत्र्यानंतर एक अत्यंत प्रामाणिक आणि संपूर्ण देशातील राज्यांना एकत्रित ठेवण्याची महत्त्वाची कामगिरी ज्यांनी केली ते सरदार पटेल यांचा उल्लेख हा प्रकर्षाने करावा लागेल, असे शरद पवार म्हणाले. तसेच, सरदार पटेल यांच्यानंतर उत्तर प्रदेशातून पंडित गोविंद वल्लभ पंत आणि महाराष्ट्रातून यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते. त्यामुळे या पदाची प्रतिष्ठा आणि गरिमा ही वाढवण्यासाठी या थोर देशभक्तांनी मोलाचे काम केले. बाबूभाई जशुभाई हे अतिश कर्तबगार स्वच्छ आणि प्रामाणिक असे मुख्यमंत्री गुजरातने दिले होते. माधव सिंह सोलंकी, चिमणभाई पटेल, अशी अनेक नावे सांगता येतील. हे गुजरातने उत्तम प्रशासक देशाला दिले. ही जी नावे आहेत त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यापैकी कुणालाही त्यांच्या राज्यातून कधी तडीपार केलेले नव्हते. तडीपार न केलेले आणि गृहखाते आणि गुजरातमधून योगदान देणार्या नेत्यांची मला आज आठवण येत आहे. देशाच्या विद्यमान गृहमंत्र्यांनी भाषणातून काही विधाने केली. मला वाटते त्यांनी थोडी माहिती घेऊन बोलायला हवे, असे सांगत शरद पवार यांनी अमित शहांना टोला लगावला आहे.
पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी जी काय भूमिका घेतली ही तुम्ही पाहिली. उद्धव ठाकरेही त्यावर त्यांचे मत सांगतील. ज्यावेळेला अमित शहा हे गुजरातमध्ये राहूही शकत नव्हते, तेव्हा त्यांना मुंबईत आश्रय देण्यात आला होता. त्यावेळी बाळासाहेबांच्या घरी जाऊन यासंदर्भात सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली होती. याच्याबद्दल अधिक माहिती उद्धव ठाकरेच सांगतील. परंतु, दुर्दैवाने एकंदर किती पातळी घसरली हे सांगायाला ही पुरेशी उदाहरणे आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीने जी काही विधाने केली त्याची नोंद त्यांच्या पक्षातही किती घेतील, यावर भाष्य न केलेले बरे, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले.