जेम्स अँडरसनला विजयाने निरोप
| लॉर्ड्स | वार्ताहर |
वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसने शुक्रवारी (दि.12) निवृत्त झाला. इंग्लंडने वेस्ट इंडीजवर एक डाव व 114 धावांनी मात करीत तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेत जेम्स अँडरसनला विजयाने निरोप देण्यात आला. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने एकूण 704 बळी मिळवले आहेत. अखेरच्या कसोटीत त्याने चार फलंदाज बाद केले.
वेस्ट इंडीजची अवस्था गुरुवारी अखेरीस सहा बाद 79 धावा अशी बिकट झाली होती. शुक्रवारी पहाटे त्यांचा दुसरा डाव 136 धावांवरच संपुष्टात आला. पहिल्या डावात प्रभावी कामगिरी करणाऱ्या गस ॲटकिन्सन याने दुसऱ्या डावातही ठसा उमटवला. त्याने 61 धावा देत पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जेम्स अँडरसनने 32 धावा देत तीन फलंदाज बाद केले. गस ॲटकिन्सन (7/45 व 5/61) याने बारा फलंदाज बाद करीत कसोटी गाजवली. जवळपास अडीच दिवसांच्या आतमध्ये हा कसोटी सामना संपला.
जेम्स अँडरसननची महत्त्वपूर्ण आकडेवारी
जेम्स अँडरसन 188 कसोटी सामने खेळला आहे. तो सचिन तेंडुलकरनंतर (200 कसोटी) सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा क्रिकेटपटू ठरला. जेम्स अँडरसनने लॉर्ड्स येथे सर्वाधिक 123 बळी मिळवले आहेत. जेम्स अँडरसनने कसोटीत एका डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी 32 वेळा मिळवले आहेत. पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी सर्वाधिक वेळा मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो सातव्या स्थानावर आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत एका मैदानात सर्वाधिक 141 बळी मिळवत जेम्स अँडरसनने तिसरा क्रमांक मिळवलेला आहे.
एक काळ असा होता की विराट कोहलीला कोणत्याही चेंडूवर बाद करू शकतो, असा विचार मनामध्ये यायचा. पण आता त्याला बाद करूच शकत नाही, असे वाटते. याचाच अर्थ प्रत्येक खेळाडूच्या कारकीर्दीत चढ-उतार येतच असतात. दुखापती, निवडप्रकिया, संघातून वगळण्यात येणे अशा बाबींचा अडथळा मलाही आला. पण, माझ्या खेळातील कौशल्याच्या जोरावर सातत्याने संघात पुनरागमन केले.
जेम्स अँडरसन, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज
