विधी महाविद्यालय प्रकल्पपूर्तीचा आनंद – अ‍ॅड. राजीव साबळे

। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या अशोक साबळे विधी महाविद्यालयाचा भूमीपूजन सोहळा 22 मार्च 2020 रोजी करण्यात आला असला तरी टाळेबंदीच्या काळात सर्वच कामे ठप्प पडलेली असताना संस्थेच्या सर्व मंडळीनी सामुदायिक प्रयत्नांतून हा प्रकल्प साकारला आहे. विधी महाविद्यालय प्रकल्पपूर्तीचा आनंद असल्याचे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. राजीव साबळे यांनी केले आहे. मंडळाच्या वतीने द. ग.तटकरे महाविद्यालय माणगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले की, विधी महाविद्यालय हा माणगाव येथे उभारण्यात आलेल्या प्रकल्प कोकणातील शान असून माणगावच्या वैभवात यामुळे निश्‍चितच भर पडली आहे. विधी महाविद्यालय माणगावला सुरू करण्यासाठी आम्ही दोन वेळा शासनाकडे अर्ज केला असून, ते दोन्ही अर्ज शासनाने फेटाळले. नंतर न्यायालयीन लढाई करून दादांच्या नावाने अर्ज केल्यावर योगायोगाने विधी कॉलेजला मान्यता मिळाली. आता लवकरच यावर्षी विधी महाविद्यालयातून 35 विद्यार्थी वकील पदवी संपादन करून बाहेर पडणार आहेत. या परिषदेस राजिपचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार, माजी नगरसेवक सचिन बोंबले, माजी स्वीकृत नगरसेवक तथा संस्था पदाधिकारी नितीन बामगुडे, मजिद हाजिते, अ‍ॅड. सुशील दसवते, सुनील पवार, प्रा. खामकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version