। पनवेल । प्रतिनिधी ।
नवीन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयामध्ये उन्हाळी ‘छंदवर्ग’ संपन्न झाला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके संपन्न झाली. फडके विद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या मातृसंस्थेच्या मार्गदर्शनानुसार शाळेच्या शैक्षणिक वर्गाची सांगता या शिबिराच्या माध्यमातून झाली.
यामध्ये ढोल-ताशा, लाठी-काठी, एरोबिक्स, चित्रकला, हस्तकला, मेहंदी, नेलआर्ट, साडीवरील कलाकुसर, जर्मन भाषा वर्ग इ. विविधांगी कलांचा समावेश होता. सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रातील प्राप्त केलेले नैपुण्य प्रात्यक्षिक व प्रदर्शनाच्या माध्यमातून उपस्थितांसमोर सादर केले. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी, प्रशिक्षक, विद्यालयाच्या सर्व माध्यमाच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, तसेच पालकवृंद यांनी आवर्जून उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे कला. मुलांमध्ये अभ्यासाबरोबरच काही चांगले गुण असतात. ते प्रकट करण्याची संधी वेगवेगळ्या उपक्रमांतून त्यांना मिळवून देणे, हा या शिबिरामागील हेतू आहे, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापिका मानसी वैशंपायन यांनी दिली. नाममात्र शुल्क आणि त्या त्या विषयातील तज्ज्ञ व निष्णात मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण हे या छंदवर्गाचे वैशिष्ट्य होते. यामुळे सर्व मुलांनी विविध कला आत्मसात करण्याचा आनंद प्राप्त केला, असे मत पालक मुग्धा भागवत यांनी व्यक्त केले.