नवमतदारांचा मतदानासाठी उत्साह

| गडचिरोली | प्रतिनिधी |

माओवादग्रस्त व राज्यातील सर्वांत संवेदनशील गडचिरोलीत शुक्रवारी सकाळी सात वाजेपासूनच ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. लोकशाहीच्या सर्वांत मोठ्या उत्सवात नवमतदार उत्साहाने सहभागी झाले होते, तर ज्येष्ठ नागरिकांनीही गर्दी केली होती.

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या आखाड्यात 10 उमेदवार आहेत. सहा विधनासभा क्षेत्रांचा यात समावेश आहे. 1891 मतदान केंद्रांवर 16 लाख 18 हजार 690 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात पुरुष मतदार 8 लाख 14 हजार 763 असून महिला मतदारांची संख्या 8 लाख 2 हजार 434 आहे. तृतीयपंथी 10 मतदार आहेत. संवेदनशील 319 मतदान केंद्रे असून माओवाद्यांकडून घातपाती कारवाया होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने सुमारे 15 हजार जवानांचा फौजफाटा बंदोबस्त करण्यासाठी तैनात करण्यात आला आहे. गडचिरोलीसह आरमोरी, अहेरी तसेच, गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या चार विधानसभा क्षेत्रात सकाळी सात ते दुपारी तीन अशी मतदानाची मुदत आहे, तर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी व चिमूर येथे सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.गडचिरोली शहरासह दुर्गम-अतिदुर्गम भागात सकाळच्या टप्प्यातच मतदारांनी गर्दी केली. जिल्ह्यातील तापमान 43 अंशावर पोहोचलेले आहे. त्यामुळे अनेक मतदार सकाळीच मतदान करण्यासाठी घराबाहेर पडल्याचे चित्र दिसून आले. कुरखेडा येथे दीड तास उशिराने सुरू झाले. मतदान कुरखेडा येथे ग्रामीण विकास उच्च प्राथमिक शाळा खोली क्र. 2 येथील ईव्हीएममध्ये बिघाड आल्याने मतदान सकाळी सात वाजता सुरू होऊ शकले नाही. दुसरे ईव्हीएम लावून मतदान सुरू केले, पण त्यातही तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे तब्बल दीड तास मतदार ताटकळले होते. आता मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे.

Exit mobile version