‘जनआक्रोश’ला उत्सफूर्त प्रतिसाद

खारपाडा ते खारपाले निर्धाराने भरले खड्डे
। पेण । प्रतिनिधी ।

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी शुक्रवारी (दि.26) पुकारण्यात आलेल्या जनआक्रोश आंदोलनाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत शेकाडो हात एक-एक करीत एकत्र आले नि स्वखुशीने आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनाचा धसका घेतलेले प्रशासन आणि रायगड दौर्‍यावर असलेले मंत्री याठिकाणी फिरकलेसुद्धा नाही.

पेण तालुका पत्रकार, सह्याद्री प्रतिष्ठान पेण, सोबती संघटना पेण यांनी 20 ऑगस्ट रोजी मुंबई-गोवा महामार्गाच्या खारपाडा ते खारपाले यादरम्यानचे स्वःखर्चाने व स्वःमेहनतीने खड्डे भरण्याचा निर्धार करून जनआक्रोश आंदोलनाचे नियोजन केले होते. त्यानंतर गेली सहा दिवस या आंदोलनासाठी या संघटनांचे प्रतिनिधी जोरदार तयारीला लागले होते. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी जनआक्रोशाच्या आंदोलनाचे नियोजन केल्याचे पेण तालुक्यात समजल्यानंतर कित्येक संघटनांनी स्वःखुशीने या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले.

आंदोलन होऊ नये म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना आंदोलन करणार्‍यांबरोबर चर्चा करण्यास पाठविले. परंतु, अधिकारी फक्त बोळवन करत होते, हे आंदोलनकर्त्यांच्या ध्यानात आल्यानंतर त्यांनी आंदोलन होणारच असे ठामपणे अधिकार्‍यांना सांगितले. मुंबई-गोवा महामार्गावरील भोगावती पुलापासून सकाळी 9.30 च्या सुमारास जनआक्रोश आंदोलनाला सुरूवात झाली. या आंदोलनात 15 ते 85 वयोगटातील सर्वच सहभागी झाले होते.

सोबती संघटनेचे अध्यक्ष संस्थापक ज्येष्ठ समाजसेवक बापूसाहेब नेने, बापूसाहेब आठवले, अलिबागचे ज्येष्ठ पत्रकार भारत रांजणकर, सूर्यकांत पाटील, राजा म्हात्रे, मिहिर धारकर, निवृत्ती पाटील, संतोष ठाकूर, दिपश्री पोटफोडे, डॉ. मनिष वनगे, शिवदास शिंगासने, नरेंद जाधव, सतीश पोरे, विजय पाटील, रामकृष्ण जैस्वाल यांच्यासह सुहीत जीवन ट्रस्ट मतिमंद व गतिमंद शाळेची मुले, पेण प्रायव्हेट हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी, भाऊसाहेब नेनेचे विदयार्थी, कोनायन्सन शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, शब्दभेदी सामाजिक संस्था खारेपाट विकास मंच, विक्रम मिनीडोअर चालक, आम्ही पेणकर यांच्यासह काही राजकीय पक्षाचे कार्यकर्तेदेखील सामील झाले होते. जन आक्रोश आंदोलनाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

लेखणी ठेवली बाजूला
आज मुंबई-गोवा महामार्गावर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी आपल्या लेखण्या बाजूला ठेवून फावडा, घमेली उचललेली जनसामान्यांनी पाहिले. तर, या आंदोलनासाठी हरिओम रिक्षावाले आणि निलेश ठाकूर टॅक्ट्ररवाले यांनी विशेष सहकार्य केले.

प्रशासनाला आंदोलना धसका
प्रशासन व मंत्री महोदयांनी आंदोलनाचा मोठा धसका घेतल्याने बांधकाममंत्र्यांनी पेणमध्ये न थांबण्याचा विचार केला. त्यामुळे पेणच्या तहसीलदार कासू येथे मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी पोहोचल्या. महत्त्वाची बाब म्हणजे, मंत्री महोदयांना याचा विसर पडला की, मुंबईकडून येताना पहिले पेण, नंतर कासू लागते. परंतु, प्रसार माध्यमांच्या ताकदीपुढे मंत्री महोदयांनी येण्याचे धाडस दाखवले नाही हेच खरे. एकीकडे सर्वसामान्य माणूस रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी रस्त्यावर उतरले असताना, दुसरीकडे हार-तुरे घेण्यासाठी मंत्री महोदय आसुसलेले पहायला मिळाले.

Exit mobile version