बंगळुरूमध्ये आढळला दुसरा रुग्ण; दोन चिमुकलींना विषाणूची लागण
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
चीनमध्ये एचएमपीव्ही व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसने आता भारतातही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. देशात नवी मेटान्यूमो व्हायरसचे (एचएमपीव्ही) तीन रुग्ण आढळले आहेत. दोन रुग्ण कर्नाटकात, तर एक रुग्ण गुजरातमध्येही आढळला आहे. कर्नाटकात एका आठ महिन्यांच्या मुलाला आणि तीन महिन्यांच्या मुलीला व्हायरसची लागण झाली आहे. तर अहमदाबादमध्ये दोन महिन्यांच्या मुलाला लागण झाली आहे. त्यामुळे भारतातही आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.
भारतातील या व्हायरससंबंधी परिस्थितीबद्दल माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये एचएमपीव्ही भारतासह जागतिक स्तरावर आधीपासूनच प्रसारित झाला आहे आणि विविध देशांमध्ये एचएमपीव्हीशी संबंधित श्वसन आजारांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. या संक्रमणावर लक्ष ठेवले जात असताना भारतातही याची तीन प्रकरणे आढळून आली आहेत. या तिन्ही रुग्णांनी कुठलाही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही, म्हणजेच भारतात आढळलेल्या संक्रमणांचा चीनमधील संसर्गाच्या वाढलेल्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असेही या निवेदनात सांगण्यात आले आहे.
भारतात एचएमव्हीपी संसर्ग हा बॅप्टिस्ट हॉस्पिटल-बेंगळुरूमधील एका तीन महिन्याच्या मुलीला आणि आठ महिन्याच्या मुलाला झाल्याचे आढळून आले आहे. दोन्ही मुलांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे आढळून आली होती, त्यानंतर सध्या मुलीला डिस्चार्ज देण्यात आला असून, मुलावर उपचार केले जात आहेत आणि तो बरा होत आहे.
लक्षणे काय?
ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) सामान्य सर्दी आणि कोरोना व्हायरससारखी लक्षणे दर्शविते. त्यामध्ये खोकला, ताप व सर्दी यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे. कोविड-19 नंतर पाच वर्षांनंतर ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही)चा प्रादुर्भाव चीनच्या अनेक भागांमध्ये वाढत आहे, ज्यामुळे अधिकारी चिंतेत आहेत. परिणामी, अधिकारी लोकांना मास्क घालणे आणि वारंवार हात धुणे यांसारखी खबरदारी घेण्याचे आवाहन करीत आहेत.
ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस काय आहे?
ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) हा आरएनए विषाणू आहे, जो न्यूमोव्हिरिडे कुटुंबातील मेटाप्युमोव्हायरस वंशातील आहे. 2001 मध्ये डच संशोधकांनी सर्वात पहिल्यांदा याचा शोध लावला होता. हा विषाणू श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो. एचएमपीव्ही प्रामुख्याने खोकताना आणि शिंकताना बाहेर काढलेल्या श्वसनाच्या थेंबांद्वारे पसरतो. संक्रमित व्यक्तींच्या जवळच्या संपर्कातून किंवा दूषित वातावरणाच्या संपर्कातूनदेखील या विषाणूचे संक्रमण होऊ शकते.
विषाणू महाराष्ट्राच्या वेशीवर
हा विषाणू महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचला आहे. त्यानुसार राज्य सरकारनेही यासंदर्भात योग्य खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. येत्या दोन दिवसांत आरोग्य विभागाची बैठक मुंबईत घेतली जाणार आहे. या बैठकीनंतर रोगाबद्दल घेण्यात येणार्या काळजीबद्दलचे निर्देश जाहीर केले जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
आजपासून प्राणी संग्रहालयं बंद?
एकीकडे एचएमपीव्ही व्हायरसने भारतात शिरकाव केल्याने खळबळ उडालेली असताना, प्राणी संगहालयांमध्येदेखील एव्हियन फ्ल्यू विषाणूने उत्पात माजविला आहे. नागपूरमध्ये तीन वाघांच्या मृत्यूनंतर केंद्र सरकारने प्राणी संग्रहालये बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. उद्यापासून प्राणी संग्रहालये बंद राहण्याची शक्यता आहे. प्राण्यांना एव्हियन फ्ल्यू विषाणूची लागण होत असल्याने केंद्र शासनाचे निर्देश आले आहेत. नागपुरतील गोरेवाडा येथील तीन वाघांच्या मृत्यूनंतर आता केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राणी संग्रहालय बंद करण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे उद्यापासून राज्यातील प्राणी संग्रहालय काही काळासाठी बंद ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.
हे करा :
जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असतील, तेव्हा तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका. 2. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा. 3. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा. 3. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा. 4. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.
हे करू नये :
हस्तांदोलन, 2. टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर, 3.आजारी लोकांशी जवळचा संपर्क, 4. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे., 5.सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.,6. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.