पशुपालकांनी सतर्क राहावे; आरोग्य यंत्रणेकडून आवाहन
। पेण । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात कर्जतनंतर पेण तालुक्यात लम्पी संसर्ग झालेला बैल पेण अंतोरा येथे आढळला आहे. या पार्श्वभूमीवर पशुवैद्यकीय अधिकारी विष्णू काळे यांनी पशुपालकांना आपले पशुधन सांभाळण्यासाठी योग्य त्या खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, जनावरांचे गोठे फवारणी करून निर्जंतुकीकरण करून घेणे. माशांचा उपद्रव कमी करण्यासाठी गोठ्यांतील शेणाची लवकरात लवकर विल्हेवाट लावणे. शेण खड्ड्यांत टाकणे अथवा शेण कागदात बंद करून टाकणे. गायी, म्हशी प्रखर सूर्यप्रकाशामध्ये चरण्यास (सकाळी 10 ते संध्या. 4 पर्यंत) सोडू नये. जेणेकरून चावणार्या माशांचा प्रादुर्भाव कमी होईल. कीटकांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गायी-म्हशीच्या अंगावर, तसेच गोठ्यात वनस्पतीजन्य किंवा जनावरांसाठी शिफारशीत रासायनिक गोचीडनाशकांची फवारणी करावी. जनावरांच्या त्वचेमध्ये काही बदल आढळल्यास त्वरित पशुवैद्यकीय दवाखान्यांशी संपर्क करावा, असे आवाहन डॉ. काळे यांनी कृषीवलशी बोलताना केले आहे.
अंतोरा येथील दत्तात्रेय थळे यांच्या बैलाला दोन दिवसांपूर्वी लम्पीची लागण झाली आहे. गेली दोन दिवस आम्ही त्यावर उपचार करत असून, उपचाराला योग्य प्रतिसाद बैल देत आहे व त्याच्यात सुधारणा देखील होत आहेत.
डॉ. विष्णू काळे
पशुवैद्यकीय अधिकारी
आमच्या गावातील दत्तात्रेय थळे यांच्या बैलाला लम्पी संसर्ग झाल्याचे समजताच पूर्ण गावामध्ये ज्यांच्या ज्यांच्याकडे पशुधन आहे, त्यांना ग्रामपंचायतीकडून योग्य त्या सूचना दिल्या आहेत, तसेच संपूर्ण गोठा निर्जंतुकीकरण करण्यास सांगितलं आहे.
अमित पाटील, सरपंच, अंतोरा