। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमधील काही भागातील नागरिकांची स्वच्छतेच्या बाबतीत मानसिकता नसल्यामुळे त्या-त्या भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे अभ्यासू व सुशिक्षित नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपरिषदेमार्फत कचरा वेचक महिला कचरा संकलन करण्याचे काम निमितपणे करीत असतात. परंतु, काही नागरिक जाणून-बुजून आपल्या जवळील ओला सुका कचरा आजूबाजूच्या गटारात फेकत असल्यामुळे त्या-त्या भागात दुर्गंधी पसरलेली असून घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे.
गावातील अनेक ठिकाणी घरगुती लॉजिंग पर्यटकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. त्या लॉजिंगमधील प्लास्टिक बाटल्या तसेच अन्य कचरा नियमितपणे येणार्या कचरा वेचक महिलांकडे न देता काहीजण बाजूच्या गटारात टाकत टाकत असतात. यावर तोडगा काढण्यासाठी नगरपरिषदेने वस्तीच्या ठिकाणी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे जो कोणी कचरा गटारात टाकेल त्यांच्यावर स्वच्छता विभागामार्फत दंडात्मक कारवाई करता येऊ शकते. काही नागरिकांनी आपल्या घरातील शौचालयासाठी सेफ्टी टँक बांधलेले नसल्यामुळे शौचालयाचा पाईप थेट गटारात सोडल्याने सर्व घाण त्या गटारात पडत असते. त्यामुळे सफाई कामगारांना या दुर्गंधीमुळे स्वच्छता करणे खूपच कठीण बनलेले आहे. स्वच्छता विभागाच्या अधिकार्यांनी नियमितपणे गावात फेरफटका मारून पाहणी करणे आवश्यक असल्याचे सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे.
पर्यावरणवादी माथेरानमध्ये घाणीचे साम्राज्य
