मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना उशिरा जाग

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यात काविळच्या साथीने थैमान घातले आहे. परंतु, आरोग्य यंत्रणा ही तोकडी पडत आहेत. गेली दोन वर्षे जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक असल्याने सर्वसामान्यांचा आवाज अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. गेल्याच आठवड्यात वढाव गावची 13 वर्षांची पूर्वा म्हात्रे हिचा या काविळने बळी घेतला. तेव्हा कुठे प्रशासनाचे डोळे उघडले. उशिरा का होईना रविवारी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी वाशी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. महत्त्वाची बाब म्हणजे, वाशी आरोग्य केंद्राकडून वरिष्ठांच्या आदेशाची वाट न पाहता उपाययोजनेला सुरूवात केली आहे. कारण, वाशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा म्हात्रे या स्थानिक असल्याने त्यांना या काविळच्या साथीची तीव्रता लगेच लक्षात आली. त्यामुळे त्यांनी उपाययोजनाही सुरू केली.

काविळची साथ येण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे ग्रामीण भागात होणारा पाणीपुरवठा. हा पाणीपुरवठा पूर्णतः दूषित असल्याने हा साथीचा आजार उद्भवल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खारेपाटाला पाणीपुरवठा हा शहापाडा धरणातून होतो. या धरणाच्या जलशुद्धीकरण केंद्राची स्थिती काय आहे, याबाबत कुणाला काहीही घेणेदेणे नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आपली वातानुकूलित खोली सोडता येत नसल्याने ग्रामीण भागात कशा प्रकारे पाणीपुरवठा सुरू आहे याची माहितीच नाही, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. उशिरा का होईना डॉ. बास्टेवाडांना पेण वाशी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देण्याची तरी इच्छा झाली, असे बोलले जात आहे.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी अपर्णा खेडेकर, गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोल, वाशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. मनिषा म्हात्रे, वाशी सरपंच संदेश ठाकूर, वढाव सरपंच पूजा म्हात्रे यांच्यासह वाशी विभागातील ग्रामस्थ हजर होते.

Exit mobile version