| खांब | प्रतिनिधी |
इपीएस-95 राष्ट्रीय संघर्ष समिती रोहाचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या आदेशानुसार नवी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर 27 राज्यातील महाआंदोलनासाठी दि. 9, 10, व 11 मार्च रोजी सुमारे 40 ते 50 हजार पेन्शनर उपस्थित होते. या आंदोलनाबाबत सरकारकडून मिळालेल्या अश्वासनानंतर पेन्शनदारांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. आंदोलनकर्ते यांची मागणी रुपये 7 हजार 500 पेन्शन वाढ व अधिक महागाई भत्ता, वैद्यकीय मोफत मेडिकल सुविधा, हायर पेन्शन निकाल सर्वांना मिळावे, ज्यांना पेन्शन मिळत नाही तसेच ज्यांनी फॉर्म भरले नाहीत, अशा कामगारांना रुपये 5 हजार देण्यात यावे, अशा चार मागण्याकरिता हे आंदोलन करण्यात आले होते. 11 मार्च रोजी खासदार मेधा कुलकर्णी यांनी भाषणात सांगितले की, श्रम मंत्री मांडविया यांना भेटून आले व त्यांच्याजवळ पेन्शन वाढीबद्दल सविस्तर चर्चा करून लवकरात लवकर इपीएस-95 पेन्शन वाढीचे काम होईल, असे त्यांनी आश्वासन दिले आहे. आंदोलनातील शेवटच्या दिवशी कमांडर अशोक राऊत यांनी, सरकारला 2 एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. जर पेन्शनवाढ केली नाही तर रास्ता रोको, रेल्वे रोको किंवा आमरण उपोषण करण्यात येईल. तरी यापुढे सर्व पेन्शनर बंधू-भगिनीने माननीय कमांडर अशोक राऊत यांच्या देशव्यापी आंदोलनाला साथ द्यावी, असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले व त्यानंतर आंदोलन समाप्त करण्यात आले.






