। चिपळूण । प्रतिनिधी ।
कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे.अशा कठीण प्रसंगात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आह. ही गरज ओळखून चिपळूणमधील अमोल शशिकांत टाकळे, त्यांचे सर्व मार्गदर्शक आणि सहकारी मित्र व रक्तदाते यांनी फक्त सामाजिक शैक्षणिक व अन्य क्षेत्रात कार्यरत असणार्या दोनशे पेक्षा जास्त रक्तदात्यांना ब्लड लाईन ग्रुपच्या माध्यमातून एकत्रित केले, असून गेले काही दिवस दररोज रक्तदानाची चळवळ अविरतपणे सुरू आहे.
सदर ग्रुपच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी रक्त,प्लेटलेट्स इत्यादी रक्तदाते आणि रक्तपेढीच्या माध्यमातून तत्परतेने देण्याचा ब्लड लाईन ग्रुपचा संकल्प असून ग्रुपच्या योगदानातून लवकरच रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाईल. तसेच प्रत्येक शिबिराला प्रोजेक्ट चेअरमन म्हणून ब्लड लाईनच्या वेगळ्या सदस्याला संधी दिली जाईल. सदर ग्रुपचे कार्य फक्त चिपळूण पुरते मर्यादित न ठेवता उत्तर रत्नागिरी मधील अनेक रक्तदात्यांना भविष्यात एकत्रित करण्याचा संस्थेचा मानस आहे. ब्लड लाईनच्या या स्तुत्य उपक्रमाचे गरजू रुग्णाचे नातेवाईक तसेच अनेक क्षेत्राशी निगडित व्यक्तींकडून अभिनंदन केले. ज्या गरजू रुग्णांना रक्ताची कमतरता भासेल त्यांच्या नातेवाईकांनी ब्लड लाईनचे प्रमुख अमोल शशिकांत टाकळे यांच्या 9423296920 या क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवाहन ब्लड लाईन ग्रुपच्या माध्यमातून सर्व सन्माननीय सदस्यांच्या वतीने करण्यात येत आहे.