मूर्तिकारांना घ्यावा लागतोय जनरेटरचा आधार
| चिरनेर | वार्ताहर |
ऐन सणासुदीच्या म्हणजे गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला असून, गणरायाची मूर्ती घडवणारे मूर्तिकार सध्या रंगसंगतीच्या कामात गुंतले आहेत. त्यांना स्प्रेद्वारे शेडिंगचे रंगकाम करताना विजेअभावी मोठी समस्या निर्माण होत आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने मूर्तिकारांना नाहक भाड्याच्या जनरेटरचा आधार घ्यावा लागत आहे.
मूर्तिकारांचे रंगरंगोटीचे महत्त्वपूर्ण काम अगदी हातघाईवर आले असून, विजेचे विघ्न त्रासदायक ठरत आहे. असे चित्र सध्या चिरनेर कलानगर येथे पाहावयास मिळत आहे. महावितरण कंपनीने गणेशोत्सवात तरी कारभार सुधारावा, अशी मागणी येथील मूर्तिकार भाई चौलकर, नंदकुमार चिरनेरकर, रंगनाथ चौलकर, गजानन चौलकर, दामोदर चौलकर, संदेश चौलकर, सुनील चौलकर, प्रसाद चौलकर, विलास हातलोनकर, नारायण चौलकर, विष्णू चौलकर, प्रकाश चिरनेरकर, कुणाल चिरनेरकर, विजय चौलकर, राम चौलकर, नरेश हातनोलकर, जीवन चौलकर, अमित चिरनेरकर व अभिजित चिरनेरकर यांनी केली आहे.
याबाबत संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा या मूर्तिकारांनी प्रयत्न केला. मात्र, फोन स्विच ऑफ असल्याने संपर्क होऊ शकला नाही. पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची कामे करूनदेखील वारंवार वीज खंडित का होते, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेला असून, चिरनेरच्या कलानगरामधील गणपती कारखान्यांमध्ये युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र, विजेच्या लपंडावामुळे कारखानदार हैराण झाले आहेत. त्यातच महावितरणचे अधिकारी ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.