|रोहा | प्रतिनिधी |
रोहा मुरुड रस्त्यालगत म्हसाडी धनगरवाडी येथे असणार्या धनगर समाज कल्याणकारी संस्था रोहा, तळा, मुरुड तालुक्याच्या समाज मंदिरात 15 ऑगस्ट रोजी कारिवणे गावातील समाजसेवक शाहीर जयवंत कोकरे यांच्या स्वखर्चातून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती प्रदान करण्यात आली. या मूर्तीची प्रतिष्ठापना धनगर समाज कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष धाऊ ढेबे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
दरम्यान, या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना जयंत कोकरे यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यात डोंगर वस्तीत अजूनही तमाम धनगर समाज राहात आहे. शैक्षणिक सोयीसुविधांच्या अभावी येथील समाज शिक्षणापासून वंचित आहे. त्यामुळे आपल्या समाजातील माता भगिनींना, त्याचप्रमाणे वडीलधार्यांना धनगर समाजाच्या महिला शासक व समाजकार्यकर्त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी अज्ञान आहे. त्यांच्याविषयीची माहिती सगळ्यांना मिळावी यासाठी रोहा तालुक्यातील प्रत्येक धनगर वाड्यात अहिल्यादेवींच्या मूर्ती भेट देण्याचा निर्धार पक्का केला आहे.
या कार्यक्रमासाठी धनगर समाज कल्याणकारी संस्था रोहा, तळा, मुरुड तालुक्याचे अध्यक्ष धाऊ ढेबे, उपाध्यक्ष रवी झोरे, खजिनदार चंद्रकांत शिंगाडे, सदस्य अनंत लांबोरे, वसंत शिंगाडे, योगेश कोकरे महादेव शिंदे, नारायण गोरे इत्यादी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.