| सुतारवाडी | वार्ताहर |
रा.जि.प.शाळा कामथ येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी शाळेतील ध्वजारोहण मधुकर निळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दि.13 ते 15 ऑगस्टदरम्यान शाळेत ध्वजारोहण व विविध उपक्रम राबविण्यात आली. यामध्ये वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका रेश्मा वाघचौरे यांनी, तर सूत्रसंचालन सहशिक्षिका अंजली गुंजोटे यांनी केले.
दरम्यान, वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक निधी सुतार, द्वितीय दीपिका पवार, तृतीय क्रमांक पटकाविणार्या राज निळेकर या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी भारतमाता विनंती वाघमारे, जिजाऊ निधी सुतार आदी विविध वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या. यावेळी सचिन निळेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वही, स्केचपेन, पेन्सिल, पेन, वॉटर बॉटल अशा विविध वस्तू भेट म्हणून दिल्या.
कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन अध्यक्ष सेजल सुतार, उपाध्यक्ष जयश्री जाधव, ग्रा.पं. सदस्य अरविंद निळेकर, आशा कार्यकर्ती विद्या निळेकर तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, तरुण तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.