| मुंबई | प्रतिनिधी |
माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे यांचे डिपॉझिट वाचले तरी खूप मोठी गोष्ट आहे, अशी खोचक टीका शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी केली आहे. या निवडणुकीत भाजप आमच्यासोबत आहे. भाजपचे पदाधिकारी आमच्यासाठी काम करतील, अमित ठाकरे यांच्यासाठी नव्हे, असेही सरवणकर यांनी म्हटले. सदा सरवणकर यांनी रविवारी माहीम मतदारसंघात रॅली काढली होती. ही रॅली शिवसेना भवनासमोरुनही गेली. यावेळी सदा सरवणकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमित ठाकरे यांना डिवचले.
काही दिवसांपूर्वी प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांनी केलेले भाषण चांगलेच गाजले होते. हे भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे प्रिया सरवणकर यांनी माहीमधील आजच्या रॅलीचे नेतृत्व केले. यावेळी प्रिया सरवणकर यांनी म्हटले की, माहीमचा मुस्लीम समुदाय आमच्यासोबत आहे. अमित ठाकरे यांना यंदा मनसेकडून लाँच करण्यात आले आहे. लोक त्यांच्यावर टीका करत आहेत. माहीम विधानसभेत मुस्लीम समुदाय महाविकास आघाडीसोबत नाही. हा समुदाय सदा सरवणकर यांच्या बाजूने असल्याचा दावा प्रिया सरवणकर यांनी केला.