माणसे सुधारली तरी दुर्गुण जात नाहीत – मृदुला गडणीस

| कर्जत । प्रतिनिधी ।

आपली संतांची भूमी आहे. संत वाड.मयाचा अभ्यास का करायचा? असा अनेकांना प्रश्‍न पडतो. ज्ञानेश्‍वर हे आपले आद्य कवी आहेत. माऊली भाषा शास्त्रज्ञच होते. स्वतःतील परमेश्‍वर ओळखायला शिका. असे सर्वच संत सांगतात. जे संतां सारखे वागतात ते ही संतच आहेत. भगवत गीता पाच हजार वर्षांची आहे. सर्व संतांनी गीतेतील तत्वज्ञान मांडलेले आहे. त्यांचा आपल्याला काय उपयोग? असाही प्रश्‍न काहींना पडतो. कितीही माणसे सुधारली तरी त्यांच्यातील दुर्गुण जात नाहीत. ही शोकांतिका आहे.’असे परखड प्रतिपादन लेखिका मृदुला गडणीस यांनी केले.

ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या 31व्या वर्धापन दिना निमित्त अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेच्या सभागृहात एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मृदुला गडणीस यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र नातू, सचिव कृष्णा लाड, अच्युत कोडगिरे, मनिषा मांजरेकर, उषा दिवेकर आदी उपस्थित होते. संगीता मुरकुटे यांनी स्वागत गीत सादर केले. नातू यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

मृदला गडणीस यांनी मार्गदर्शन करताना, ’ ज्ञानेश्‍वरीतील 13 व 16 अध्याय सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. उत्तम सुखाचे समाधानाने जीवन जगण्याचे साधन म्हणजे ज्ञानेश्‍वरी आहे. भाषेमध्ये खूप ताकद असते. आध्यात्माकडे कधी जायचे? तर उत्तर असते निवृत्त झाल्यावर. खरे तर ज्ञानेश्‍वरी, गितेच्या आधारावर लहान वयातील मुलांवर संस्कार केले तरच ती चांगली संस्कारक्षम होतील. ज्ञानेश्‍वरी समाजाला अतिशय उपयोगी आहे. व्यक्तिमत्व चांगले व्हावे त्यासाठी मुलांमध्ये 26 गुण आत्मसात करण्याची आवश्कता आहे. ते गुण यामध्ये आहेत. यातच खरा आनंद मिळतो. चांगले वागणे आपण समजून घेतले की आपण नक्कीच चांगले वागू शकतो’, असा सल्ला दिला.

पहिल्या सत्रात ज्येष्ठ सदस्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. दुसर्‍या सत्रात डॉ. मेघ:शाम हिवाळे यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. त्यानंतर पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सूत्रसंचलन प्राजक्ता गरवारे यांनी केले. याप्रसंगी सुरेश कुरतडकर, शिवाजी श्रीखंडे, बळीराम दिघे, मधुकर गांगल, विनायक चितळे, माधव परांजपे, गणेश पावसकर, रमण गांगल, प्रकाश नगरकर, भागवत, परांजपे, प्रभाकर केळकर, विजय कडू, स्वाती साने, अरुण मोकल, श्रीकांत दिवेकर, ज्योती कडू आदी उपस्थित होते.

Exit mobile version