सदाबहार अभिनेता

मराठी हिंदीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनाने रुपेरी पडद्यावरील एक आल्हाददायक, सदाबहार राजबिंडे व्यक्तिमत्व लोप पावले आहे. अनेक संस्मरणीय भूमिका करणारा आणि नायक, खलनायक, सहनायक, चरित्र अभिनेता अशी चतुरस्त्र अंगे दाखवणारा गुणी कलावंत आपल्यातून निघून गेला असून एक सातत्याने हास्य झळकवणार्‍या, उत्तम माणसालाही आपण गमावले आहे. केवळ रांगडेपणा हा नायकाचा गुण मानले जायच्या काळात त्यांनी त्याला रसाळ रूप बहाल केले आणि नायकाच्या भूमिकेतून आपले सदाबहार रुप ठसवताना ते खलनायकी भूमिकेलाही रुबाबदारपणा जोडला. मराठीत खलनायक रूबाबदार असू शकतो ही संकल्पना नव्हती तेव्हा रमेश देव यांनी या भूमिकेतही ग्लॅमर ओतले. जवळपास सहा दशकांची प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी शेकडो हिंदी, मराठी चित्रपट केले. शेकडो जाहिरातींतून ते झळकले. अवघ्या तीन दिवसांपूर्वी त्यांनी आपला 93 वा वाढदिवस साजरा केला होता. साहजिकच वयोमानामुळे त्यांची प्रकृती खालावत होती. तरी ते लवकरच एका मालिकेत दिसणार होते. रमेश देव यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले तेव्हा ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता आणि आता कितीतरी वैविध्यपूर्ण माध्यमे आणि तंत्र या क्षेत्रात आले. तरी ते सक्रीय होते, याचे कारण कभी कोई लौटा दो मेरे बिते हुए दिन असा हताश सूर आळवला नाही. ते सातत्याने नवनवीन कलाकारांशी संवाद साधत आपल्या रूपाप्रमाणेच आपल्या चित्तवृत्तीही सदाबहार अणि चिरतरुण ठेवत होते. त्यांचा चेहरा डोळ्यांपुढे येताच हाच उत्साह आपल्याला जाणवतो. मग ते दृश्य साठ वर्षांपूर्वीचे असो की अलीकडचे. जिद्द व मेहनतीवर भिस्त ठेवून त्यांनी एकाहून एक सरस असे चित्रपट दिले व आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात दीर्घ काळ कायमचे स्थान मिळविले. या प्रदीर्घ काळात त्यांनी स्वत: विशिष्ट परिघात अडकणार नाही, याची काळजी घेत चौफेर मुशाफिरी केली. वर उल्लेखलेल्या नायक, सहनायक, चरित्र अभिनेता, खलनायक अशा सर्वच पडद्यापुढील भूमिका केल्या. तसेच, निर्माता, दिग्दर्शक अशा पडद्यामागील प्रांतातही त्यांनी आपला हात आजमावला. मराठीसह अनेक हिंदी चित्रपटातही त्यांनी उत्तमोत्तम भूमिका केल्या असल्या तरी ऋषीकेश मुखर्जी यांच्या ऑल टाइम हीट ‘आनंद’ या चित्रपटात त्यांनी मनापासून रंगवलेला राजेश खन्नाचा डॉक्टर मित्र ही त्यांच्यासाठी अनेक अर्थाने महत्वाची भूमिका होती. त्याला दादही तशीच मिळाली. त्यांच्या हिंदीतील भूमिकांत आनंद चित्रपटातील त्यांनी आपली पत्नी सीमा देव यांच्यासोबत साकारलेली मराठी जोडप्याची भूमिका आठवते. उत्कृष्ट नायक बनण्यासाठी लागणारे रूप, मेहनत, अभिनय कौशल्य अशा सर्वच गोष्टी त्यांच्याकडे होत्या. मात्र या भूमिकेने त्यांना हिंदीत पाय रोवायला मदत केली, हे नाकारता येत नाही. परंतु त्याचबरोबर हेही लक्षात घ्यायला हवे की ते मराठीत बरे चालले आहे म्हणून तेव्हाच्या अनेक अभिनेत्यांप्रमाणे शांत बसले नाही तर हिंदीत स्ट्रगल सुरू केला. अशाच एका ठिकाणी त्यांची ऋषीकेश मुखर्जी यांची भेट झाली. वास्तविक आनंद चित्रपटातील सीमा देव यांनी केलेल्या भूमिकेसाठी तेव्हाची प्रसिद्ध अभिनेत्री नंदा यांचे नाव निश्‍चित झाले होते. परंतु अनेक घडामोडीनंतर त्यांनी नंदा आणि नंतर रमेश देव यांनी निभावलेल्या भूमिकेसाठी घेतलेले राजकुमार दोघांनाही काढून टाकले आणि ऋषीदा रमेश देव यांच्या घरी आले. तेथे त्यांनी सीमा देव यांनाही पाहिले. त्यापुढचा सगळा इतिहास सर्वांना माहिती आहे. या भूमिकेत दोघांनीही मराठी संवादाचा रंग भरला आणि ती अजरामर केली. या दोघांचे जवळपास सहा दशकांचे सहजीवन ही देखील सिनेक्षेत्रात क्वचित दिसणारी घटना आहे. फुलं आणि सुंदर मुली हे माझे वीक पॉइंट होते, असे त्यांनी मुलाखतीत गमतीने म्हटले असले तरी त्या दोघांनी एकमेकांचे आयुष्य सुंदर केले. व्ही. शांताराम यांचे बंधु व्ही. अवधुत यांच्या ‘ग्यानबा तुकाराम’ सिनेमात काम करताना रमेश देव यांनी त्यांना मागणी घातली. परंतु घरच्या आर्थिक अडचणीमुळे सिनेमात आलेल्या सीमाने अशा स्थितीत लग्न करणे शक्य नसल्याचे सांगितले. तेव्हा तुझ्या घरची परिस्थिती सुधारेपर्यंत, करिअर यशस्वी होईपर्यंत आपण थांबायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले आणि तो विश्‍वास त्यांच्या दोघांतील प्रेमाचा पाया बनला जो सर्वांसाठी आदर्शयुक्त ठरला. ते आपल्यातून गेले तरी त्यांचा राजबिंडा, सदाबहार चेहरा कायम आपल्या हृदयात राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Exit mobile version