निरोगी गावासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा- डॉ. गुणे

| उरण | वार्ताहर |
वहाल गावातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून वहाल ग्रामपंचायतीने स्मशानभूमीच्या परिसराचे सुशोभीकरण, प्रवेशद्वार,सभामंडप, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण व पथदिव्यांची कामे मार्गी लावली आहेत. अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले आहे. अशा वहाल गावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपलं गाव निरोगी कसे राहील यासाठी पुढाकार घेतला तर एक आदर्शवत, प्रेरणादायी आपलं गाव म्हणून ओळखले जाईल, असे प्रतिपादन डॉ. गिरीश गुणे यांनी व्यक्त केले.

वहाल गावातील स्मशानभूमीच्या परिसराचे सुशोभिकरण, कै. गंगाबाई नामदेव नाईक प्रवेशद्वार, कै. चंद्राबाई धनाजी म्हात्रे सभामंडप, बौद्धवाडा अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पथदिवे तसेच वृक्षारोपण आदी वहाल ग्रामपंचायतीने सामाजिक कार्यकर्ते तथा शेकापचे नेते राजेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विकासकामांचा उद्घाटन सोहळा गुरुवारी (दि. 21) डॉ. गिरीश गुणे, अरुणबुवा कारेकर, राजेंद्र पाटील, तसेच इतर मान्यवरांचे हस्ते पार पडला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून गोरगरीबांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या डॉ. गिरीश गुणे यांचा वहाल प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गुलाब फुले देऊन सन्मानित केले.

यावेळी अरुण कारेकर, राजेंद्र पाटील, प्रवीण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी सरपंच तथा शाळेचे चेअरमन सुरेश पाटील, वामन कडू, गणाबुवा दापोलकर, कुमारदादा नाईक, चेतन घरत, समीर घरत, जनार्दन म्हात्रे, नारायण घरत, सिताराम घरत, गणेश दापोलकर, भास्कर बुवा देवरेकर, रामनाथ घरत, कपिल घरत, सचिन घरत सह आजी, माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून युपीएससी परीक्षेत यश मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रविण इंगले या तरुणांचा सत्कार डॉ गिरीश गुणे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रविण इंगले या गरीब तरुणांचा पुढील शिक्षणाचा खर्च वहाल ग्रामपंचायत करणार असून प्रविण इंगले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे आवाहन शेवटी राजेंद्र पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले आहे.

Exit mobile version