अंतर्गत रस्त्यांची शोभा वाढली
। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस भयानक होत चालली होती. मात्र, सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी तसेच पी.पी. खारपाटील कंट्रक्शन अँड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पांडुरंग खारपाटील, सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र खारपाटील, गावातील कार्यकर्ते व ग्रामपंचायतीचे सदस्य या सर्वांच्या अतोनात प्रयत्नातून गावातील प्रमुख अंतर्गत रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली होती. या रहदारीच्या महत्त्वपूर्ण रस्त्यांचे काँक्रिटीकरण व मजबुतीकरणाचे काम युद्धपातळीवर करण्यात आले असून, चिरनेर गावाचे आता रूपडेच बदलून गेले आहे. यामुळे चिरनेरच्या नागरिकांबरोबर परगावातील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.
सद्यस्थिती चिरनेर गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था बिकट बनली होती. पायी चालण्यास व वाहतुकीस हे रस्ते धोकादायक बनले होते. मात्र, या रस्त्यांच्या दुरावस्थेच्या समस्या आजपर्यंतचे सत्ताधिकारी दूर करू शकले नाहीत. हे वास्तव आहे. दरम्यान, चिरनेर हे इतिहास प्रसिद्ध स्वातंत्र्यवीरांचे गाव आणि श्री महागणपतीचे तीर्थस्थान असताना, गावातील रस्त्यांची अवस्था शोभादायक नव्हती. मात्र, सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी आणि पी.पी. खारपाटील कंट्रक्शन अँड कंपनी, ग्रामपंचायतीचे सदस्य आणि विविध पक्षातील कार्यकर्ते व गावकर्यांच्या साथीमुळे चिरनेर गावातील रस्त्यांची शोभा वाढली आहे.
दरवर्षी या अंतर्गत मुख्य रस्त्यावरून गणपती बाप्पांना मोठ्या कसरतीने प्रवासाची शर्यत पार करावी लागत होती. एवढी अंतर्गत रस्त्याची दुर्दशा झाली होती. परंतु, यावर्षी गणपती बाप्पांचा प्रवास या रस्त्यांच्या नूतनीकरणामुळे सुखकर होणार आहे. तसेच, या कामासाठी उरणचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर, सहाय्यक गटविकास अधिकारी संतोषसिंग डाबेराव, चिरनेरचे ग्रामविकास अधिकारी महेश पवार यांचेही मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे सांगण्यात आले.