| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
महाराष्ट्र विधानसभेचा निकाल अनपेक्षित असून, महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली असतानाच कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनीही ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप केला असून, हा प्रकार निवडक मतदारसंघांमध्ये झाल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा हादरा बसला आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना 50 आमदारांचाही आकडा गाठता आलेला नाही. तर, दुसरीकडे महायुतीमधल्या एकट्या भाजपने 132 जागा मिळवल्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार निवडून आले आहेत. महायुतीने 233 जागांवर यश मिळवले आहे. महायुतीला इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत कसं मिळू शकतं, असा सवाल मविआ नेत्यांनी केला. दुसरीकडे, कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनीही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ईव्हीएम हॅक झाल्याची धक्कादायक माहिती आम्हाला मिळाली असल्याचे कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमवरुन शंका उपस्थित केली आहे.
जी परमेश्वरा म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचीच सत्ता येईल असे आम्हाला वाटले होते, पण सगळेच उलटले. शनिवारी आमच्या महाराष्ट्रातील काही नेत्यांची बैठक झाली आणि निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण करण्यात आले. ईव्हीएम हॅक झाल्याची धक्कादायक माहिती आम्हाला मिळाली आहे. हे प्रत्येक मतदारसंघात नाही, तर निवडक मतदारसंघामध्ये घडले. त्यांनी ईव्हीएम हॅक केल्याचं मला वाटतं आहे. हे खरे असेल तर यावर काहीही बोलण्याची गरज नाही. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहोत, असं कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्राच्या निकालानंतर लढा मोठा असून, लोकांचे प्रश्न मांडत राहणार असल्याचे म्हटलं आहे. महाराष्ट्राचा निकाल अनपेक्षित आहे. या निकालामागची खरी कारणे समजून घेण्याचा पक्ष प्रयत्न करत आहे. आम्ही आमचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांचे आभार मानतो. छत्रपती शिवाजी, शाहूजी, फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचे आम्ही खरे प्रतिनिधी आहोत, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.