| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत रेल्वे स्थानकात प्रवास करण्यासाठी आलेल्या महिला प्रवाशाला चक्कर आली. त्या तरुणीला तात्काळ स्थानकातील पोलिसांनी वैद्यकीय अधिकार्यांकडे उपचारासाठी दाखल केले. त्यामुळेच महिला प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
22 नोव्हेंबर रोजी दुपारी कर्जत रेल्वे स्थानकात 21 वर्षीय अंकिता अविनाश दाभोलकर प्रवास करीत होत्या. कर्जत स्थानकातील पुणे दिशेकडे असलेल्या पादचारी पुलावरून प्रवास करताना चक्कर येऊन पडल्या. त्यावेळी स्थानकातील रेल्वे पोलीस हे सेवेत तैनात होते. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अंकिता या तरुणीला उचलून रेल्वे चिकित्सालयीमध्ये नेले. पोलीस कर्मचारी हवालदार राज बागुल, माने, पोलीस शिपाई भोईर तसेच होमगार्ड वाघमारे यांनी चक्कर येऊन पडलेल्या तरुणीला घरातील मुलगी असल्यासारखे चिकित्सालयामध्ये नेले. पोलीस शिपाई संजय भोईर यांनी दाखवलेली समयसूचकता यामुळे महिला प्रवासी अंकिता यांना वेळेत रुग्णालयात नेले. अंकिता अविनाश दाभोळकर या महिला प्रवासी साईनगर खंडेगोळवाडी कल्याण येथून कर्जत असा प्रवास करीत होत्या. त्या महिला प्रवाशाला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सिंग यांनी उपचार करून सदर महिला प्रवासी यांच्यावर यशस्वी उपचार केले. त्याबाबत आई दिपीका अविनाश दाभोळकर यांना त्याबाबत मोबाईल फोनवरून घडलेली घटना सांगण्यात आली. दीपिका दाभोलकर यांच्या सांगण्यावरून अंकिता यांना गगन गौतम खडक यांच्यासोबत पाठवण्याची सूचना केली. या सर्व प्रकारामुळे दाभोलकर कुटुंबाने कर्जत रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहेत.