पोलीस, उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष; परिसरातील नागरिक त्रस्त
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
महामार्गालगत सुरु असलेल्या मद्य विक्री दुकानातून मद्य खरेदी करून दुकानांबाहेर खुलेआम मद्य पार्ट्या रंगत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मुंब्रा-पनवेल महामार्गावर खुटारी गाव, नावडे वसाहत तसेच कळंबोली वसाहतीजवळ सुरु असलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त असून, पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून असे प्रकार बंद करावेत, अशी मागणी रहिवासी करत आहेत.
अतिमद्यपान करून वाहन चालवल्यामुळे होणार्या अपघातांची संख्या मोठी आहे. हे अपघात रोखण्यासाठी महामार्गालगत असलेली मद्य विक्री करणारी दुकाने बंद करण्याचे आदेश न्यायालयाने काही वर्षांपूर्वी दिले होते. कालांतराने न्यायालयाने हे आदेश मागे घेतल्याने महामार्गालगत असणारी बंद झालेली दुकाने पुन्हा सुरु झाली आहेत. यामध्ये मुंब्रा -पनवेल महामार्गावरील काही दुकानांचादेखील समावेश आहे. पनवेल पालिका हद्दीतील खुटारी गाव, नावडे वसाहत त्याचप्रमाणे कळंबोली वसाहतीचादेखील समावेश असून, या ठिकाणी सुरु असलेल्या मद्य विक्री दुकानांबाहेर मद्यपींकडून खुलेआम मद्यपान केले जात आहे. मद्यपींकडून सुरु असलेल्या या प्रकाराकडे गंभीरतेने पाहून मद्यपानाचे हे कार्यक्रम रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांचे उल्लंघन
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार मद्य विक्री दुकानाच्या आवारात मद्यपान करण्यास बंदी आहे. ग्राहकाने दुकानातून विकत घेतलेले मद्य इतरत्र जाऊन पिणे अपेक्षित आहे. मात्र, पनवेल पालिका हद्दीतील खुटारी, नावडे वसाहत आणि कळंबोली येथील दुकानांबाहेर या नियमांचे उल्लंघन केले जात आहे.
पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष
मद्यपींची सोय म्हणून मद्य विक्री दुकानाबाहेर खाद्य पदार्थ विक्री, थंड पेय विक्री आणि पाणी विक्री करणारे स्टॉल लावण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने सुरु असलेल्या या स्टॉल्सवर कारवाई करण्यास पालिकेचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारीदेखील टाळाटाळ करताना दिसत आहेत.