तळा केंद्रावर शांततेत परिक्षा सुरू

। तळा । प्रतिनिधी ।

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा केंद्र क्रमांक 2741 बारावी फेब्रुवारी – मार्च 2026 ची बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व शांत वातावरणात पार पडत आहे. या परीक्षेसाठी राज्यात 10 हजार 664 शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतील 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीची विद्यार्थीसंख्या सुमारे 27 हजारांनी वाढली आहे. परीक्षेच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी 271 भरारी पथकांसह अन्य काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तळा केंद्रावर कला शाखा 70, वाणिज्य शाखा 73 तर विज्ञान शाखा 94 असे एकूण 237 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. यावेळी संस्थेचे विश्वस्त मारुती शिर्के, अध्यक्ष मंगेश देशमुख, प्राचार्य दिलीप ढाकणे, प्राचार्य डॉ नानासाहेब यादव, पर्यवेक्षक महादेव लोकरे आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तळा केंद्रावर केंद्राध्यक्ष म्हणून प्राध्यापक बोळेगावे आय बी, केंद्र उपसंचालक प्रा. गायकवाड पी एम, किरण नागावकर, स्वप्निल वरंडे, प्रसाद सुतार काम पाहत आहेत. झूम पद्वारे रायगड जिल्हाधिकारी यांना तळा केंद्रावरील परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त, शांतता, पोलीस बंदोबस्त व बैठे पथकांच्या उपस्थितीत पार पडत असल्याचे लाईव्ह चित्रीकरण दाखवण्यात आले आहे.

Exit mobile version