मिनीट्रेनच्या स्थानकात नवीन बांधकाम; संनियंत्रण समितीची दुटप्पी भुमिका?
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरात जाणाऱ्या मिनीट्रेनच्या स्थानकात नवीन बांधकाम करण्यासाठी खोदकाम केले जात आहे. माथेरान स्थानक हे हेरिटेज स्थानक असून, देखील कोणत्याही प्रकाराची परवानगी न घेता खोदकाम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, राज्य सरकारची हेरिटेज कमिटी आणि माथेरान संनियंत्रण समिती या खोदकामाबद्दल गप्प का? असा प्रश्न स्थानिकांमधूल विचारला जात आहे.
माथेरान हे पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील शहर आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने माथेरान परिसराला संवेदनशील जाहीर केले असून, तेथे विहिर खोदणे, कोणत्याही प्रकारचे खोदकाम करणे इत्यादी कामांवर बंदी आहे. अशी कामे केली जात असताना त्यासाठी परवानगी देण्याचे अधिकारी माथेरान सनियंत्रण समितीला आहेत. मात्र, मंत्रालय स्तरावर असलेल्या या समितीचे शहरात येणे नसल्याने अनधिकृत बांधकामांना ऊत आल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे. अनेक बांधकामांची प्रकरणे न्यायालयीन स्तरावर असून देखील संनियंत्रण समितीकडून माथेरान कडे दुर्लक्ष केले जात असल्याचे देखील बोलले जात आहे.
सध्या माथेरान स्थानकातील नवीन बांधकाम करण्याची कामे सुरू आहेत. त्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. त्यासाठी रेल्वे जमिनीमध्ये केले जात असलेले खोदकाम हे कोणत्याही परवानगी विना सुरू असून, तो संपूर्ण परिसर हेरिटेज वास्तूमध्ये समाविष्ट असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ही जमिन रेल्वेची असल्याने कोणतीही हरकत घेतली जात नाही. परंतु, माथेरानमध्ये हेरिटेज नियमावलींचे निर्बंध असताना देखील खोदकाम केले जात असल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, हेरिटेज नियम हे राज्यसरकारकडून बनवण्यात आले आहेत आणि त्यांना खोटे ठरवण्याचे काम माथेरान सारख्या हेरिटेज वास्तूंची मांदियाळी असलेल्या गावात सुरू असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे माथेरान संनियंत्रण समितीकडून शहरातील बांधकामांवर हरकत घेतली जात आहे. परंतु, त्याच संनियंत्रण समितीची परवानगी नसताना रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या बांधकामांना हरकत घेतली जात नाही.त्यामुळे ही दुटप्पी भूमिका असून, शासनाने याबद्दल ठोस भूमिका जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. शहरात अन्य ठिकाणी संनियंत्रण समिती नियम लावत असताना यापूर्वी शार्लोट लेकमधील पाणी सोडून देण्यात आले होते. आणि दुसरीकडे आता माथेरान रेल्वे स्थानकात खोदकाम सुरू असताना माथेरान संनियंत्रण समिती गप्प असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्वांना एकसारखे नियम असावेत, अशी मागणी केली जात असून माथेरानमध्ये रेल्वेकडून आगामी काळात आमच्या जमिनीमध्ये खोदकाम करण्यास परवानगीची गरज नाही, असे देखील जाहीर केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे वन जमिनीवर वसलेल्या माथेरानमध्ये प्रत्येकाला वेगवगेळे नियम लावले जाणार असतील तर अनधिकृत बांधकामे थांबण्याची शक्यता कमीच असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.







