हेन्री ओक्झेंडन यांच्या वाड्याचे उत्खनन सुरू
। महाड । वार्ताहर ।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित असणारे इंग्रज अधिकारी हेन्री ओक्झेंडन यांनी काही काळ किल्ले रायगडावर वास्तव्य केले होते. ते ज्या वाड्यात राहिले, त्या वाड्याच्या उत्खननाचे काम केंद्रीय पुरातत्त्व विभाग व रायगड विकास प्राधिकरणाने हाती घेतले आहे. रायगडावरील महादरवाजाच्या डाव्या बाजूच्या तटबंदीचे जतन व संवर्धन कामासही सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे रायगडावरील पडझड झालेल्या वास्तूंचे जतन होण्यास मदत होणार आहे.
रायगड किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक वास्तू असून काळाच्या ओघात त्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. तर काही अवशेष जमिनीत गाडले गेले आहेत. या वास्तूंचे जतन व संवर्धन व्हावे, अशी मागणी शिवप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात केली जात होती. त्यानंतर राज्य सरकारने रायगड विकास प्राधिकरण स्थापन केले आणि या माध्यमातून तसेच विविध सरकारी विभागांच्या माध्यमातून रायगडावर जतन व संवर्धनाची कामे हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपासून रायगड किल्ल्यावर महादरवाजाच्या डाव्या बाजूचा असलेल्या तटबंदीच्या जतन व संवर्धन कामाला सुरुवात झाली आहे. यापूर्वी उजव्या बाजूच्या तटबंदीचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या परवानगीने मराठा लष्करी वास्तुशास्त्राचे प्रतीक असलेल्या महादरवाजाच्या डाव्या बाजूला असलेली तटबंदी टकमक टोकापर्यंत पसरली असून त्याची लांबी सुमारे साडेसातशे मीटर आहे. या तटबंदीच्या संवर्धनाला सुरुवात झाली आहे. ही कामे करताना, तटबंदीवरील झाडे व झुडपे काढून टाकण्यात आली आहेत. तसेच, तटबंदीच्या आतील व बाहेरील भिंतींमध्ये मातीचे थर साठले असून ते काढण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याच तटबंदीच्या बाहेरील व आतील भिंतीवर काही ठिकाणी दगड निखळले आहेत. या दगडांचे दस्तऐवजी करण्याच्या आधारे मूळ स्वरूपात पुनर्स्थापित करण्याचे कामही केले जाणार आहे.
तटबंदीत असलेला चिलखती बुरूज आणि चोर दरवाजाचेही काम अंतिम टप्प्यात आहे. रायगडाच्या मुख्य महादरवाजाजवळ ही कामे सुरू झाल्याने लवकरच रायगड किल्ल्याला वेगळे रूप येणार आहे. तर दुसरीकडे केंद्रीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरणाकडून हेन्री ओक्झेंडन वाड्याच्या उत्खननाचे काम सुरू केले आहे.
काही इतिहासकारांच्या मते या ठिकाणी असलेली वास्तू हेन्री ओक्झेंडनचा वाडा म्हणूनदेखील प्रचलित होती. आता याच वाड्याचे उत्खनन सध्या सुरू आहे. उत्खनन पूर्ण झाल्यानंतर वास्तूचे संवर्धन आणि जतनाचे काम केले जाईल. दोन्ही कामांची पाहणी प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी राजे यांनी गुरुवारी (दि. 3) केली. रायगड प्राधिकरण व पुरातत्त्व विभागाच्या होत असलेल्या कामामुळे रायगडावरील अनेक वास्तू प्रकाशात येण्याची शक्यता आहे.