। कोलाड । वार्ताहर ।
रोहा येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी (दि.5) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत रोहा तालुक्यातील नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण कार्याध्यक्ष शैलेश पालकर, रायगड जिल्हा अध्यक्ष राकेश खराडे, खालापूर उपाध्यक्ष अर्जुन कदम, पनवेल तालुका अध्यक्ष सुनिल पाटील उपस्थित होते.
या बैठकीत रोहा तालुका अध्यक्ष किरण मोरे, उपाध्यक्ष संदेश गायकर, खजिनदार दिनेश मोरे, सचिव सुरेश पंधरे तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून अनंता म्हसकर, विश्वनाथ कोलते, काशिनाथ बामुगडे, संजय गायकवाड तसेच सल्लगारपदी समीर बामुगडे यांची निवड करण्यात आली. सुधागड तालुक्यातील मंगेश यादव आणि प्रशांत हिगणे यांनीही या बैठकीस उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शैलेश पालकर यांनी भूषवले. मार्गदर्शन करताना त्यांनी पत्रकारिता करताना तटस्थता आणि सचोटी कशी असावी यावर प्रकाश टाकला. त्यांनी अनेक किस्से सांगत पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव आणि नैतिकता यावर पत्रकारांना मार्गदर्शन केले.