। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत दिवाणी न्यायालयाच्या शेजारी कर्जत नगरपरिषद प्रशासनाकडुन न्यायदेवतेच्या स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे.मात्र त्या सेल्फी पॉईंटची दुरवस्था झाली असून पालिका प्रशासन लक्ष देणार आहेत काय? असा प्रश्न स्थानिक उपस्थित करीत आहेत.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये मिळालेल्या पारितोषिक रकमेतून कर्जत शहरात चौक सुशोभिकरण करण्यात आले. त्या चौक सुशोभीकरण नंतर पालिका प्रशासनाने ढुंकूनदेखील पाहिले नाही आणि त्यामुळे अनेक सेल्फी पॉईंट हे दुरवस्थेच्या गर्तेत आहेत. कर्जत नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारामुळे नगरपरिषदेने कोपरा गार्डनच्या नावाने संकल्पना राबविली. कर्जत शहरातील दिवाणी न्यायालयाच्या बाजूला असलेल्या न्यायदेवतेच्या मूर्ती आणि परिसर स्मारकाची दुरवस्था झाली आहे. न्यायदेवतेच्या स्मारकावर झाडांच्या फांद्या लोंबकळत होत्या तर न्यायदेवतेच्या स्मारकाच्या एका हातातील तराजु गायब झालेला आहे. तसेच स्मारकाला असलेले बॅरिकेटस देखील गायब असुन विद्युत रोषणाईचे दिवे हि बंद पडलेले आहेत. या गंभीर बाबीची नोंद ग्रामस्थांनी घेवूनदेखील कर्जत नगरपरिषद प्रशासन यांच्याकडुन कोणतीही दखल घेतली जात नाही स्मारकावर लोंबकळत असलेल्या झाडांच्या फांद्याच छाटुन टाकल्या गेल्या.
परंतु, स्मारकाच्या हातातील तुटलेला तराजु बसविलेला नाही तसेच स्मारकाचे गतवैभवदेखील पूर्ववत केलेले नाही. त्यामुळे कर्जत नगरपरिषद ऐतिहासिक, धार्मिक व देशाभिमान जागृत करणार्या स्मारकांबाबत अनभिज्ञ आहे असे दिसुन येत आहे. मुख्याधिकारी तथा प्रशासक वैभव गारवे यांनी आपल्या खात्यातील संबंधित विभागातील उदासीन अधिकार्यांवर विसंबून न राहता स्वतः जातीने लक्ष घालून न्यायदेवतेच्या स्मारकाची होणारी विटंबना थांबवुन स्मारकाचे गतवैभव प्राप्त करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पालिका प्रशासक आणि मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्याकडून या बाबीवर लक्ष दिले जात नसल्यानेदेखील नाराजी व्यक्त होत आहे.