। सुकेळी । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील नागोठणे जवळच असलेल्या ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमधील कानसई येथील 400 केव्ही क्षमता असलेल्या सबस्टेशनमध्ये बुधवारी ( दि.2) रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास स्फोट होऊन भीषण आग लागली. यावेळी येथे बाजुला असलेल्या ऑईलमुळे काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले त्यामुळे सबस्टेशनमध्ये अग्नितांडव पहावयास मिळाले.
दरम्यान यावेळी सबस्टेशनच्या समोरच असलेल्या प्राथमिक शाळेच्या आसपास स्फोट झाल्यामुळे स्फोटातील काही जळाऊ आगीचे गोळे शाळेच्या परिसरात उडुन आल्यामुळे त्या ठिकाणी शाळेच्या आजुभोवती सुकलेले गवत असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरत गेली. शाळेमध्ये पेपर सुरू असतांनाच ही आग पसरत गेल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले व सर्वांची एकच तारांबळ उडाली. यावेळी येथील स्थानिक नागरिकांनी लगेचच त्या ठिकाणी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
दरम्यान, तातडीने येथील जवळच असलेल्या जिंदाल कंपनीच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. तात्काळ जिंदाल कंपनीचे अग्निशामक दलाचे कर्मचारी प्रज्वल सकपाळ व अच्युतानंद तसेच त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. पंरतु, वातावरणातील वाढलेल्या प्रचंड उष्णतेमुळे पुन्हा आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे पुन्हा अग्निशामक दलाला पाचारण करुन आग विझविण्यात आली. या आगीत सबस्टेशनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान कानसई येथील सबस्टेशनमध्ये वारंवार आग लागण्याच्या घटना या दिवसेंदिवस वाढत असून याबाबतीत योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.