शेलू स्थानकाचे 15 डब्यांच्या लोकलसाठी विस्तारीकरण

महिलांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी

| नेरळ | प्रतिनिधी |

मध्य रेल्वे वरील मेन लाइन मार्गावर असलेल्या शेलू रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण सुरू झाले आहे. आगामी काळात कर्जतपर्यंत 15 डब्यांच्या लोकल गाड्या सुरू होणार असल्याने स्थानकाचे विस्तारीकरण केले जात आहे. मात्र, या भागातून लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली असून, महिला लोकल सुरू करण्याची मागणी महिला प्रवाशांकडून होत आहे.

मध्य रेल्वे वर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ताण वाढत आहे. त्यामुळे पूर्वी असलेल्या नऊ डब्यांच्या लोकल 12 डब्यांच्या सुरू करण्यात आल्या, मात्र तरीदेखील सकाळ आणि संध्याकाळचे वेळी प्रवाशांच्या गर्दीमुळे 15 डब्यांच्या लोकल गाड्या सुरू झाल्या आहेत. कर्जत दिशेकडे अद्याप 15 डब्यांच्या उपनगरी लोकल चालविल्या जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गर्दी आटोक्यात येण्यात अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून कर्जत दिशेकडून शेलू स्थानकात फलाटाचे विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. तेथे मुंबई दिशेकडे दोन्ही बाजूला फलाटाची लांबी वाढवली जात आहे. त्यामुळे आगामी काळात 15 डब्यांची उपनगरीय लोकल सुरू होण्याची शक्यता आहे. शेलू या साधारण 1990चे काळात बांधण्यात आलेल्या रेल्वे स्थानकात पूर्वी स्थानिक लोकांचा लोकल प्रवास असायचा. आता या परिसरात मोठ्या प्रमाणात चाळ संस्कृती आणि इमारती उभ्या राहिल्या असून, तेथे राहणारे लोक यांची संख्या हजारोंनी वाढली आहे.

स्थानिक पातळीवर राहायला आलेले लोकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे उपनगरीय लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन सध्याच्या लोकल गाड्यांमधून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांमुळे उपनगरीय लोकल तुडुंब भरून ये-जा करीत असतात. याचा सर्वाधिक फटका महिला प्रवाशांना बसत असून, महिला प्रवाशांना बदलापूरपासून पुढे प्रत्येक स्थानकात उतरण्याची कसरत करावी लागत आहे. त्यातून सर्वाधिक वाद हे महिला डब्यांमध्ये होत असल्याचे मागील काही वर्षात दिसून आले आहे. हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मुंबईपासून कर्जत-खोपोली मार्गावर आता महिला लोकल सोडाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. महिलांसाठी विशेष गाडी सुरू केल्यास प्रवाशांचे हाल थांबतील, असा आशावाद शेलू येथील महिला कार्यकर्त्या रेखा हिरेमठ यांना आहे. महिला बचतगट चळवळ चालवणाऱ्या रेखा हिरेमठ यांनी रेल्वे प्रशासनाला फलाटाची लांबी वाढवून आणि 15 डब्यांची गाडी सुरू करून प्रश्न सुटणार नाही तर महिला प्रवाशांच्या सुरक्षेचे महिला लोकल सुरू करावी, अशी मागणी केली आहे.

Exit mobile version