जिल्ह्यात 164 सार्वजनिक, तर 17 हजार 459 घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
चैतन्यमय वातावरणात दहा दिवस विराजमान झालेल्या गणपती बाप्पांना भावपूर्ण वातावरणात शुक्रवारी निरोप देत गणेशोत्सव सोहळ्याची अनंत चतुर्दशीला सांगता झाली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे आवाहन गणरायाला करण्यात आले. जिल्ह्यात सार्वजनिक 164 आणि 17 हजार 459 गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. दरम्यान, विविध गणेश मंडळांनी मिरवणुका काढल्या होत्या.

अलिबागमध्ये शहरातील अलिबागचा राजा, शहरात आदर्श गणेशोत्सव मंडळ घरत आळी, सन्मित्र गणेशोत्सव मंडळ मिरची गल्ली, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, सामान्य रुग्णालय आदी सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाच्या मिरवणुका काढून बाप्पाला निरोप देण्यात आला.

दहा दिवस गणरायाला अभ्यंग, पंचामृत, धूप, दीप, मोदकांचा नैवेद्य असा भक्तांचा पाहुणचार घेऊन श्रीगणेशाने निरोप घेतला. संध्याकाळी विसर्जनस्थळी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात गणपतींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यात आले. मागील कोरोनाच्या संकटकाळानंतर पुन्हा एकदा विसर्जन मिरवणूक काढून शिस्तबद्धपणे गणरायाला भक्तीमय अशा वातावरणात निरोप देण्यात आला. अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने कृत्रिम विसर्जन तलावाची निर्मिती करण्यात आली होती. नगरपरिषदेच्या वतीने सर्व गणेशोत्सव मंडळाचे स्वागत करुन निर्माल्य गोळा केले जात होते. तसेच जीवरक्षकांद्वारे गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली गेली होती. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्ष अॅड. मानसी म्हात्रे, मुख्याधिकारी अंगाई साळूंखे यांच्यासह सर्व माजी नगरसेवक, माणुसकी प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. राजाराम हुलवान यांच्यासह सर्व सदस्य जातीने देखरेख करुन गणेशभक्तांसाठी सुविधा उपलब्ध करुन देत होते.

ढोलताशा आणि डिजेच्या दणदणाटात तरुणाईसह आबालवृद्धांची पावले ताल धरून थिरकत होती. ते सर्व मंत्रमुग्ध होऊन नाचत होते. जिल्ह्यात बंदोबस्तासाठी सुमारे दोन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले आहेत. त्यामध्ये सहा पोलीस उपविभागीय अधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक हे स्वतः जिल्ह्याच्या विविध ठिकाणी लक्ष ठेवून होते. त्याचप्रमाणे स्थानिक पोलीस ठाण्याचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.