पाण्याचा मार्ग रोखून शेतकऱ्याचे पीक उद्ध्वस्त

किसान क्रांती संघटना आक्रमक

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील मालवाडी येथे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा रोखल्यामुळे एका शेतकऱ्याची भातपेरणी पाण्याखाली जाऊन उद्ध्वस्त झाली. या प्रकरणाची दखल घेत किसान क्रांती संघटनेने आक्रमक भूमिका घेत घटनास्थळी पाहणी केली. संघटनेच्या हस्तक्षेपानंतर संबंधित जमीनमालकाने नुकसानभरपाई देण्यासह पाण्याच्या निचऱ्यासाठी कायमस्वरूपी जलवाहिनी उभारण्याचे आश्वासन दिले.

तालुक्यातील मालवाडी येथील शेतकरी जितेंद्र गणपत लेकुरवाले यांच्या शेतातील पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक मार्ग शेजारील जमिनीच्या कुंपणामुळे बंद झाल्याने संपूर्ण भातशेती पाण्याखाली गेली. तसेच शेताकडे जाणारा वहिवाटीचा रस्ताही बंद झाल्याने ट्रॅक्टरसह शेतीची कामे करणे अशक्य झाले. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या अन्यायाविरोधात लेकुरवाले यांनी किसान क्रांती संघटनेकडे धाव घेतल्यानंतर जिल्हाध्यक्ष भरत राणे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी शेतातील पाण्याचा निचरा बंद झाल्याने पिकाचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहण्यात आले.

संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर संबंधित जमीनमालकाने शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्यास तसेच भविष्यात पाणी साचू नये यासाठी कायमस्वरूपी जलवाहिनी उभारण्याचे नियोजन करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख रामदास माळी, तालुकाध्यक्ष शरद तवळे, प्रवक्ते सुरेश खानविलकर तसेच संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

शेताकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता बंद करण्यात आला. तसेच पावसाचे पाणी बाहेर जाण्याचा मार्ग अडवल्यामुळे माझी संपूर्ण भातपेरणी पाण्याखाली जाऊन खराब झाली. अनेकदा विनंती करूनही दखल घेतली गेली नाही. अखेर किसान क्रांती संघटनेकडे धाव घेतल्यानंतर माझ्या समस्येची दखल घेऊन मला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

जितेंद्र लेकुरवाले,
शेतकरी
Exit mobile version