शेतकऱ्यांची दिवाळी मदतीविना

576 शेतकरी पाच हजारांच्या ‌‘अग्रीम‌’पासून वंचित

| श्रीवर्धन | समीर रिसबूड |

दुष्काळ जाहीर झाला, शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले; मात्र शासनाच्या मदतीचा लाभ मिळवण्यासाठी त्यांना आता प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील तब्बल 576 पात्र शेतकरी अद्याप पाच हजार रुपयांच्या अग्रिम मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. कुणाच्या नावात किंवा सर्व्हे नंबरमध्ये तफावत, तर कुणाचे संपूर्ण गावच ऑनलाईन पोर्टलवर दिसत नसल्याने शेतकऱ्यांची मदत अडकली आहे. शासनाने मदत जाहीर केली असली, तरी ती वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवण्यात प्रशासनाची यंत्रणा अपुरी पडल्याचे चित्र आहे.

राज्य शासनाने श्रीवर्धन तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केल्यानंतर महसूल विभागामार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ‌‘दुष्काळ 2026‌’ अहवालानुसार तालुक्यातील एकूण 1 हजार 381 शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत. मात्र, यापैकी पोर्टलवर अंतिम मंजुरी मिळालेल्या 805 शेतकऱ्यांच्या खात्यातच थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित 576 शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित आहेत.

महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार, पाच पीक पंचनामा याद्यांमधून लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. पहिल्या यादीतील 768 पैकी 503, दुसऱ्या यादीतील 179 पैकी 89, तिसऱ्या यादीतील 267 पैकी 162, चौथ्या यादीतील 121 पैकी 44 आणि पाचव्या यादीतील 46 पैकी केवळ 7 शेतकऱ्यांना अंतिम मंजुरी मिळाली आहे. अशा प्रकारे एकूण 805 शेतकऱ्यांना मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मात्र, उर्वरित शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न गंभीर बनला आहे. तब्बल 368 शेतकऱ्यांचे सर्व्हे नंबर आणि नावांमध्ये तफावत असल्याने त्यांचे प्रस्ताव अडकले आहेत. तर कोंढे तर्फे श्रीवर्धन, कापोली, वेळास आगर, कारिवणे, भरडोली, कोलमांडले (अ व ब), देवघर, बापवन, कार्ले आणि साखरोणे या गावांतील 208 शेतकऱ्यांची गावेच ऑनलाइन पोर्टलवर दिसत नसल्याने मंजुरीची प्रक्रिया रखडली आहे.

विशेष म्हणजे, या शेतकऱ्यांनी दुष्काळाचा सामना केला, पंचनाम्याच्या प्रक्रियेतून गेले आणि मदतीसाठी पात्रही ठरले. तरीही केवळ ऑनलाइन नोंदीतील त्रुटींमुळे त्यांना मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रशासनाच्या तांत्रिक यंत्रणेतील त्रुटींचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असताना या त्रुटी आधीच का दूर करण्यात आल्या नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, तहसील कार्यालयामार्फत त्रुटी दूर करून माहिती अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातही पाच हजार रुपयांची अग्रिम मदत जमा केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र, नेमक्या किती दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होणार, याबाबत स्पष्ट कालमर्यादा समोर आलेली नाही. त्यामुळे मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या 576 शेतकऱ्यांना प्रशासनाच्या आश्वासनावरच अवलंबून राहावे लागत आहे.

Exit mobile version