सततच्या पावसाने शेतकरी हावालदिल; वादळीमुळे शेती पाण्याखाली
| कापोली | प्रतिनिधी |
सतत पडणाऱ्या पावसाने भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शक्यतो ऑगस्ट महिन्यानंतर पाऊस कमी होत जातो. परंतु, सप्टेंबर अखेरीसही पावसाचा जोर कायम असल्याने रायगड जिल्ह्या म्हणजेच भाताचे कोठार असा लौकिक असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना शेती करून फळ खायची वेळ आली अन अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातचा घास हिरावून घेतला आहे. बळीराजाला काय करावे सुचेनासे झाले आहे. अशी अवस्था कोकणातील शेतकऱ्यांची झाली आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील बहुतांश भागात नुकसान झालेले आज निदर्शनास येत आहे. रितसर पंचनामे होऊन गुंठावारी नुकसान भरपाई मिळावी असा मागणी आता जोर धरू लागली आहे. कारण कोकणातील बहुतांश शेतकऱ्यांची एकरी जमीन नाही अणि शासन तुटपुंजी एकरी वारी नुकसान भरपाई मंजूर करते. हा प्रकार शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ लावल्यासारखे आहे. शेतकऱ्यांच्या वर्षाच्या मेहनतीवर पावसाने पाणी फेरले असून कष्ट करून लावलेली काळ्या मातीतील भाताची रोपे अक्षरशः कोलमडून पडली असून, पिके पाण्याखाली गेली आहेत.
सततच्या पावसाने झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न सुरू असताना पुन्हा आलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यातील भातशेती ही फक्त उत्पन्नाचे साधन नसून घरगुती धान्य आणि शेतीची परंपरा जपण्यासाठी घेतली जाते, मात्र हेक्टरी लागणारा खर्च आणि मिळणारे उत्पादनाचा ताळमेळ नसताना नैसर्गिक आपत्तीने सर्व गणित कोलमडून टाकले आहे. कष्टातून मळा फुलवू पाहणारा शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला असून, कर्जफेड करणे कठीण झाले आहे. वर्षाची अरेसरी म्हणून लावलेली पिके नष्ट झाल्यामुळे उत्पन्नाचे स्रोत बंद झाले आहेत. शेतकरी चिंतेत सापडल्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे, मात्र पंचनाम्यानंतर प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या हातात कधी येईल असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
रायगड जिल्हा भाताचा कोठार म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षातील औद्योगिकीकरणामुळे शेत-जमिनींची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. काही ठिकाणी शिल्लक राहिलेली शेती प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. या परिस्थितीत शेतकरी विविध जातीच्या भाताची लागवड करण्याचे प्रयोग करीत असतात.अश्यानच वादळी पावसामुळे शिवारातील भाताचे पीक अक्षरशः आडवे झाले आहे. तालुक्यातील परिस्थिती अतिशय गंभीर असून, शासनाने आर्थिक मदत, कर्जमाफी, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज आहे. ओला दुष्काळ जाहीर करून मदतीची प्रक्रिया अधिक गतिमान करावी, अशी मागणी संपूर्ण तालुक्यातील होत आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने कार्यवाही केली नाही, तर आगामी काळात उपजीविकेवर बिकट संकट ओढवण्याची परिस्थिती निर्माण होईल. शेतकरी निराश होणार नाही ह्याची काळजी घेऊन शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी श्रीवर्धन तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
बळीराजाच्या पोटात भीतीचा गोळा
पाण्यावर तरंगत असलेले तण पाहून गळून पडलेले व मनाने खचलेल्या शेतकऱ्यांची अवस्था पाहिली तर मन हेलावून जात आहे.वाढत्या महागाईच्या काळात न परवडणारी शेती त्यातच कामाची वाढती मजुरी गाठीशी नसतानाही दरवर्षी असा निसर्ग कोप होत असण्याने बर्याच लोकांनी शेती करणे सोडून दिले आहे. वडिलोपार्जित शेती अजूनही काही गावातील लोकांनी राखून ठेवली आहे.ओसाड जाऊ नये म्हणून नाईलाजास्तव महागाईच्या झळा व निसर्गाने दिलेल्या कळा सहन करत जमिन ओसाड ठेवत नाहीत.
शेती कशी करावी आणि का करावी हाच प्रश्न आमच्यापुढे पडला आहे.नोकरी सांभाळून वडिलोपार्जित शेती करुन शेती जपण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. पण,आता काही वर्षांपासून पाऊल निसर्ग चक्रच बदल्याने पिक हातातोंडाशी आल्यावरही पडत आहे. मग वर्षाची मेहनत फळाला कशी येणार?
-अनंत खेडेकर
शेतकरी (वेळास)
प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे व्हावे व ज्या शेतकऱ्याने आधीच शेत कापले आहे व मळणी दरम्यान सुद्धा नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्याची सुद्धा नाव नुकसान भरपाईमध्ये समाविष्ट करण्यात यावे.
– धवल तवसाळकर
सामाजिक कार्यकर्ता





