| अलिबाग | प्रतिनिधी |
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी शुक्रवारी (दि.24) प्राप्त झाली आहे. या पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधीत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सचिव किंवा सीएससी संस्थेचे कार्यालयव बँक स्तरावर उपलब्ध आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना अग्रीस्टैंक फार्मर आयडी क्रमांक अनिवार्य असून, ज्या शेतकऱ्यांचा अग्रीस्टॅक नोंदणी नसेल त्यांनी तात्काळ जवळच्या आपले सरकारी केंद्र किंवा सीएसी केंद्रावर जाऊन अग्रीस्टॅक नोंदणी करणे बंधनकारक आहे. तरी, कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी या यादीमधील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार केंद्र किंवा सीएससी केंद्र येथे जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घेणे गरजेचे आहे. त्यासाठीची संपूर्ण प्रकिया ही जिल्हयामधील सर्व आपले सरकार केंद्र किंवा सीएससी केंद्र आणि बँकेच्या शाखेत प्रसिद्ध करण्यात आली आहे. या आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया ही विनामुल्य असून, कोणत्याही केंद्रावर पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरणासाठी कोणतीही रक्कम आदा करु नये, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक तनवीर पाटील यांनी केले आहे.







