तहसील कार्यालयात शेतकऱ्यांची ससेहोलपट

हेलपाटे मारून छळवणूक केल्याचा आरोप

| रायगड | जिल्हा प्रतिधी |

अलिबागमध्ये शेतकऱ्यांचे परंपरागत रस्ते अडवणूकीचा प्रकार धनदांडग्यांकडून सर्रास होत आहे. न्याय मिळावा, म्हणून गेल्या चार वर्षांपासून शेतकरी सरकारी कार्यालयात चपला झिजवत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे तहसीलदारांना लक्ष देण्यास फुरसत मिळत नसल्याचा आरोप होत आहे. सुनावणी आणि तारखांच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जात आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाकडून नाहक हेलपाटे मारून शेतकऱ्यांची छळवणूक होत असल्याचा आरोप शेतकरी नारायण जाधव यांनी केला असून, तहसील कार्यालयात शेतकऱ्यांची ससेहोलपट होत असल्याचे बोलले जात आहे.

नारायण जाधव यांच्याकडून मिळालेल्या निवेदनानूसार, अलिबाग-पेण मार्गावरील रस्त्यालगतच पळी-आंबेघर येथे त्यांची स.नं. 28/1 मध्ये 45 गुंठे शेत जमीन आहे. पिढ्यापिढ्या भात पिकांसह इतर पिकांची लागवड करण्याचे काम ते करीत आहेत. तसेच, विक्रमी उत्पादन घेतल्यमुळे त्यांचा सन्मानही झाला आहे. त्यांच्या शेत जमीनीच्या जवळ काही धनदांडग्यांनी प्लॉट पाडून जमीनी खरेदी केल्या आहेत. त्याच जमीनीत मातीचा भराव करून उंच संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे नारायण जाधव यांच्या शेताकडे जाण्याचा पुर्वपरंपरागत मार्ग बंद झाला आहे. भरावामुळे पिकती जमीन देखील नापीक झाली आहे. त्यामुळे मालकीच्या शेतात पाऊलही ठेवता येत नाही, असा आरोप जाधव यांनी केला आहे. कसदार जमीन ओसाड पडल्यामुळे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अखेर नारायण जाधव या शेतकऱ्यांनी अलिबाग तहसील कार्यालयापासून महसूल मंत्री यांच्यापर्यंत जाऊन न्यायासाठी दाद मागितली. मात्र, तहसील कार्यालयाकडून फक्त कागदी घोडे नाचवले जात असल्याचा आरोप त्यांच्याकडून होत आहे. परंपरागत वहिवाटीचा रस्ता सुरु करून देण्याची कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. अलिबागच्या तहसीलदारांकडून फक्त तारीख आणि सुनावणी लावून वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांसह मंडळ अधिकारी यांच्या विरोधात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

Exit mobile version