दुबार पेरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात

शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

| वावोशी | वार्ताहर |

खालापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून हवामानातील अनिश्चिततेचा मोठा फटका सोसला आहे. त्याच पार्श्वभूमीवर वरद विनायक शेतकरी सामाजिक संस्था खालापूर यांच्यावतीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या व मागण्यांसंदर्भात मंगळवारी (दि.1) खालापूर तहसीलदारांकडे निवेदन सादर करण्यात आले.

मे महिन्यापासून तालुक्यात पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी जून महिन्यात खरीप हंगामाची पेरणी केली. मात्र, पावसाच्या लहरीपणामुळे या पेरण्या पूर्णपणे रुजल्या नाहीत. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा खर्च उचलावा लागत आहे. अशा स्थितीत पुन्हा संपूर्ण शेती उगम घेईल याची हमी नाही. त्यामुळे शासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तात्काळ मदतीचे पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच, सन 2022-23 या वर्षातील शेती नुकसानीसाठी शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही आजतागायत त्यांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा झालेली नाही. याबाबत त्वरित कारवाई करून नुकसान भरपाई वितरीत करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Exit mobile version