। अलिबाग। वार्ताहर।
कार्लेखिंड परिसरात अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त आहे. दिवसेंदिवस वाढते तापमान व सायंकाळी भरून येणारे काळेकुट्ट ढग यामुळे पावसाला अनुकूल वातावरण तयार होत आहे. पण पाऊस पडत नाही त्यामुळे पेरण्यांची तयारी करून बसलेल्या शेतकर्याला चिंता सतावत आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात नेहमीच पावसाचे आगमन होत असते. शेतकरी पावसाळ्यापूर्वीच्या मशागतीची कामे आटोपून पेरणीला लागणार्या बी-बियाण्यांची तजवीज या काळात करून ठेवत असतो. पण 15 जून उजाडला तरी पावसाचा अजून पत्ता नाही. त्यामुळे या वर्षीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरणीला उशीर झाल्यास लावणीलादेखील उशीर होणार. याचा विपरीत परिणाम पिकांवर होऊ शकतो याची भीती शेतकर्यांना भेडसावत आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे मोठा त्रास झाला. या वर्षी निदान नीट पाऊस पडेल या आशेवर आम्ही आहोत, पण अजून पेरणी झाली नाही, मग लावणी कधी होईल. बी-बियाणे आणून ठेवले आहे. आता पाऊस लवकर पडो अशी प्रार्थना करीत आहोत.