30 जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळणार असून, येत्या 30 जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. 21 मे रोजी केली. खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी बँकांना सीबील स्कोअरची अट न लावण्याचे आणि कर्जवाटपात अडथळे निर्माण न करण्याचे स्पष्ट निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पुन्हा पीककर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याच्या खरीप हंगामाची पूर्वतयारीची बैठक घेतली. त्याआधी बँकर्ससोबत कर्जवाटपासंदर्भात बैठक झाली. त्यामध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्ज कसे मिळेल यांची तजवीज करण्यात आली. जिल्हा सहकारी आणि ग्रामीण बँक मिळून 67 टक्के कर्ज दिले जाते तर, 26 टक्के कर्ज हे इतर राष्ट्रीयकृत बँकांकडून देण्यात येतय. परंतु, राष्ट्रीयकृत बँकांकडून त्यांचे 80 टक्के कर्जवितरणाचे टार्गेट पूर्ण होत नाही, ते त्यांनी पूर्ण केले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कर्जाचं वाटप करताना शेतकऱ्यांकडून सीबील स्कोअरची मागणी करू नये, त्यांची कसलीही अडचण करू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. सगळ्या बँकांसोबत कर्जमाफी संदर्भात चर्चा केली आहे. कर्जमाफीची माहिती कोणत्या फॉरमॅटमध्ये द्यायची याची चर्चा झाली आहे. वेळेत कर्जमाफी पूर्ण करू शकू याचे नियोजन केले आहे. यंदा सर्वात मोठे संकट हे एल निनोचे आहे. पावसाचा अंदाज 88 टक्के वर्तवण्यात आला आहे. यामुळे पाण्याचा कमीत कमी उपयोग कसा करता येईल असा प्रयत्न करावा लागेल. पिकांचे सायकल कसे नीट करता येईल असा प्रयत्न करायला पाहिजे. 30 जूनपूर्वी कर्जमाफी करणार आहोत. पुढच्या हंगामासाठी आपले शेतकरी कर्जासाठी पात्र असणार आहेत, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
यावेळी त्यांनी संभाव्य एल निनो आणि कमी पावसाच्या अंदाजाबाबतही चिंता व्यक्त केली. यंदा पावसाचा अंदाज 88 टक्के असल्याने पिकांवर ताण येण्याची शक्यता असून, त्यानुसार कृषी नियोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना गती देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘महाविस्तार'
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी “महाविस्तार” ॲप सुरू करण्यात आले असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पीकपद्धती, हवामान आणि शेतीविषयक मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती मुख्यंमत्री फडणवीस यांनी दिली. दरम्यान, खतांच्या पुरवठ्यावर सरकारचे विशेष लक्ष असून, औद्योगिक क्षेत्रासाठी खतांचा गैरवापर होणार नाही यासाठी देखरेख आणि व्हिडिओग्राफी केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
