भाजप किसान मोर्चाचा प्रकल्पाला तीव्र विरोध; मंजुरी न देण्याची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
राज्यात भाजपची सत्ता असताना कर्जतमधील टोरंट प्रकल्पाला शेतकऱ्यांकडून विरोध होत असतानाच आता भाजप किसान मोर्चानेही या प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांवरून सरकारला घरचा आहेर दिला आहे. पश्चिम घाटातील जैवविविधता, वनसंपदा आणि नैसर्गिक जलस्रोत धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त करत जलविद्युत व पंप्ड स्टोरेज प्रकल्पांना मंजुरी देऊ नये, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सुनील गोगटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने 27 जुलै 2026 रोजी पश्चिम घाट पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या प्रारूप अधिसूचनेचा अभ्यास करून गोगटे यांनी ही भूमिका मांडली आहे. रायगड आणि पुणे जिल्ह्यांतील पश्चिम घाट परिसरात प्रस्तावित धरणे, जलविद्युत आणि पंप्ड स्टोरेज प्रकल्पांमुळे जंगलतोड, डोंगरकपात, वन्यजीवांचे अधिवास आणि नैसर्गिक जलप्रवाहांवर गंभीर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
कर्जत तालुक्यातील टोरंट प्रकल्पामुळे पेज नदीचे पर्यावरणीय आरोग्य, जैवविविधता, मासेमारी, शेती आणि स्थानिक पाणीपुरवठा प्रभावित होण्याची शक्यताही त्यांनी अधोरेखित केली आहे. त्यामुळे रायगड आणि पुणे जिल्ह्यांतील सर्व प्रस्तावित प्रकल्पांचा एकत्रित पर्यावरणीय परिणाम अभ्यास करूनच निर्णय घ्यावा, तसेच स्थानिक ग्रामसभा, नागरिक आणि पर्यावरणतज्ज्ञांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकल्पाला अंतिम मंजुरी देऊ नये, अशी मागणी गोगटे यांनी केली आहे.
