कोकण आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील 80 हजार एकर हून अधिक सुपीक शेत जमीन बळकावण्याचा घाट सरकारने घातला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत कोकण भवन येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ‘तिसरी मुंबई रद्द करा’ या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण केले. एमएमआरडीए केएससी नवनगर तिसरी मुंबई विरोधी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी (दि.15) आंदोलन पुकारले होते.
समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, 4 मार्च 2024 रोजीच्या अधिसूचनेद्वारे राज्य सरकारने तिसरी मुंबई विकास आराखडा तयार केला. प्रस्तावीत तिसऱ्या मुंबईसाठी पेणमधील 88, उरणमधील 29 आणि पनवेलमधील 7 अशा एकूण 124 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाविरोधात हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शासनाकडे गेल्या अडीच वर्षापासून पत्र व्यवहार केले आहेत. 25 हजार शेतकऱ्यांनी हरकती नोंदवूनदेखील त्यावर सरकारने अद्यापपर्यंत सुनावणी घेतली नाही. भांडवलदारांच्या भल्यासाठी हा प्रकल्प असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मेडीसीटीसह पेण ग्रोथ सेंटर असे गोंडस नाव देऊन हा प्रकल्प आणण्याचा घाट घातला आहे. या प्रकल्पामध्ये या तीन तालुक्यांतील हजारो एकर सुपीक शेतजमीन जाणार आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. प्रस्तावित प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे एमएमआरडीए केएससी नवनगर तिसरी मुंबई विरोधी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने या प्रकल्पाच्या विरोधात कोकण भवन येथील आयुक्त कार्यालयाच्या बाजूला लाक्षणिक उपोषण शनिवारी पुकारले. या प्रस्तावित प्रकल्पाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला असल्याचे रुपेश पाटील यांनी सांगितले. शनिवारी पुकारण्यात आलेल्या उपोषणामध्ये हजारोच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. दरम्यान, आयुक्त कार्यालयापर्यंत लाँग मार्च काढण्यात आला. दरम्म्यान, “तिसरी मुंबई रद्द करा” अशी घोषणा देत सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली.
यावेळी एमएमआरडीए के.एस.सी. नवनगर तिसरी मुंबई विरोधी समिती रायगडचे अध्यक्ष सुधाकर पाटील, कार्याध्यक्ष संतोष ठाकूर, सरचिटणीस रुपेश पाटील, एमएमआरडीए तिसरी मुंबई विरोधी 88 गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अनंत पाटील, कार्याध्यक्ष ॲड.विकास म्हात्रे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख माजी आ. मनोहर भोईर, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डॉ. मनीष पाटील, पंचायत समिती सभापती महेश म्हात्रे, शेकाप तालुका चिटणीस रवी घरत, जिल्हा परिषद सदस्य ॲड. अविनाश ठाकूर, पंचायत समिती सदस्य कविता पाटील, प्रारंभी गावंड, दीपक भोईर, महेंद्र ठाकूर, सुरेश पाटील, रमाकांत पाटील, बी.एन. डाकी, विनोद म्हात्रे, कृष्णा पाटील, सत्यवान भगत, प्रकाश पाटील, गोपाळ जोशी, रश्मिता पोपेटा व उपोषणकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवी मुंबईपासून उरण, पनवेलमध्ये वेगवेगळे प्रकल्प निर्माण करण्यासाठी हजारो शेतकऱ्यांच्या जमीनी घेतल्या. मात्र, आजही स्थानिक शेतकरी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. 35 ते 40 वर्षे होत आली असतानाही शेतकऱ्यांना स्थानिक भूमीपुत्रांना न्याय मिळाला नाही. प्रस्तावित तिसरी मुंबई प्रकल्प उभारताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही. या प्रकल्पामुळे गावपण नष्ट होणार आहे. शेती जाणार आहे. त्यामुळे तिसरी मुंबई नको ही आंदोलनकर्त्यांची भुमिका आहे. त्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
– रुपेश पाटील, सरचिटणीस, एमएमआरडीए के.एस.सी.
नवनगर तिसरी मुंबई विरोधी समिती





