| पेण | प्रतिनिधी |
पेण खरेदी-विक्री संघामार्फत सरकारने शेतकर्यांचे भात विकत घेऊन चार महिने उलटून गेले तरी आजतागायत शेतकर्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. पेण तालुक्याचे भाताचे कोठार समजल्या जाणार्या खारेपाट विभागातील शेतकरी आज आपल्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने हवालदिल झालेला आहे.
खारेपाटातील शेतकर्यांसाठी वाशी-वाढाव यात्रा, कळवे-दादर यात्रा, बोरी-गडब यात्रा या यात्रा सणांपेक्षा मोठ्या असतात. या यात्रांना नातेवाईक शहरातून गावाकडे येत असतात. 4 एप्रिलपासून या यात्रांना सुरुवात होत असून, हक्काचे पैसे न मिळाल्याने शेतकरी चिंतेत आहे. दर आठवड्याला बिचारा बळीराजा चौकशीसाठी शहराकडे येत असतो. त्याला आश्वासनापलीकडे काहीच हाती लागत नाही. येणार्या यात्रांच्या अगोदर जर भात विक्रीचे पैसे सरकारकडून मिळाले नाही, तर शेतकर्यांना उसनवार करावी लागेल. तरी लवकरात लवकर शेतकर्यांचे पैसे मिळावेत, अशी मागणी बळीराजा करीत आहे.