| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यात दोन दिवस झालेल्या समाधानकारक पावसामुळे भातशेतीला नवसंजीवनी मिळाली असून, शेतातील भाताचे तरवे हिरवीगार झाली आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने भात लागवडीची कामे पुन्हा खोळंबली आहेत.
सध्या अनेक शेतकऱ्यांनी रोपवाटिकेत (तरव्यात) भाताची रोपे तयार झाली आहेत. तरवे जोमात वाढत असले तरी लागवडीसाठी आवश्यक असलेले पाणी शेतात साचत नसल्याने प्रत्यक्ष लागवडीच्या कामाला सुरुवात करता आलेली नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून, पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हवामान ढगाळ असले तरी पाऊस न पडल्याने शेतीची मशागत, नांगरणी व चिखलणीची कामेही रखडली आहेत. वेळेत पाऊस झाला नाही तर लागवड उशिरा होऊन उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण लक्ष आता येत्या काही दिवसांतील पावसाकडे लागले असून, लवकरच दमदार पाऊस झाल्यास भात शेतीच्या कामात वेग येईल आणि खरीप हंगाम सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत
